कोल्हापूर: अंबाबाई महालक्ष्मीच्या दानपेटीची मोजणी सुरु, पहिल्याच दानपेटीत ३६ लाखांचं दान

आणखी ८ दिवस दानपेट्यांची मोजणी सुरु राहणार असल्याची माहिती
कोल्हापूर: अंबाबाई महालक्ष्मीच्या दानपेटीची मोजणी सुरु, पहिल्याच दानपेटीत ३६ लाखांचं दान

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसरातील दानपेटीत भाविकांकडून जमा झालेल्या रोख रकमेची मोजणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशीच्या मोजणीत एका दानपेटीत मंदिर समितीला मिळाले ३६ लाख रूपयांचं दान मिळालं आहे. मंदिराचा गाभारा आणि परिसरात देवस्थान समितीने १२ दानपेट्या बसवल्या आहेत.

वर्षभरात या दानपेटीत भाविकांकडून जमा होणाऱ्या रोख रकमेची मोजणी कालपासून सुरु झाली आहे. पहिल्याच पेटीत ३६ लाखांचं दान मिळाल्यामुळे इतर पेट्यांमधून या दानाचा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात विविध देवदेवतांच्या श्रध्दास्थानात करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून दर्शनासाठी प्रथम प्राधान्य दिलं जातं. देशभरातील लाखो भाविकांची पावलं देवी दर्शनासाठी कोल्हापूरकडे वळतात.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गामुळं देवदर्शनावर भाविकांना मर्यादा आल्या. तरीही गेल्यावर्षी कमी-अधिक प्रमाणात श्री.अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. यातून भाविकांनी यथाशक्ती मंदिर परिसरातील दानपेटीत रोखरकमेच्या स्वरूपात दान दिलं. मंदिर गाभारा आणि परिसरात एकूण १२ दानपेटया बसवण्यात आल्या आहेत. यात जमा झालेलं धन वर्षातून एकदा मोजलं जातं. कालपालून या धन-दान मोजणीला गरूड मंडपात प्रारंभ झालाय. पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या एका दानपेटीत तब्बल ३६ लाख रूपये मिळाले आहेत.

या रोख रकमेबरोबरच दानपेटीत चांदीची एक लहान थाळीसुध्दा मिळाली आहे. आणखी ८ दिवस ही मोजणी सुरू राहणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in