13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतीलच अधीक्षकाने केले दुष्कृत्य; सर्वत्र संताप

खाजगी आश्रमशाळेच्या अधिक्षकाने इयत्ता आठवीच्या वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
A 13-year-old minor student was raped by the superintendent
A 13-year-old minor student was raped by the superintendent

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज-तांडा येथील आश्रमशाळेच्या अधिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या खाजगी आश्रमशाळेच्या अधिक्षकाने इयत्ता आठवीच्या वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर येताच पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निवासी आश्रम शाळेतील मुलांचे देखभाल करणाऱ्या अधीक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी समोर येत आहे.

नेमकं हे प्रकरण उघडकीस कसे आले?

याबाबत अधिक वृत्त असे की, पिढीत मुलगी महिनाभरापूर्वी हिंगणघाट येथून या आश्रमशाळेत शिकायला आली होती. पहिली ते दहावी वर्ग असलेली या निवासी आश्रमशाळेत 360 मुले तर 120 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.  मागील काही दिवसांपासून संबंधित मुलीला त्रास होत होता. प्रकृती बिघडल्याने तिच्या पालकांनी 4 ऑगस्टला तिला घरी परत नेले. दरम्यान पालकांनी विश्वासात घेतल्यावर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगितला.

पालकांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल

घडलेला प्रकार ऐकताच पिढीत मुलीच्या घरच्यांना धक्काच बसला. तात्काळ पालकांनी हिंगणघाट पोलिसांत धाव घेतली आणि झालेली हकीगत सांगितली. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अधीक्षक संजय इटनकर याला ताब्यात घेतले असून आरोपी व प्रकरण भद्रावती पोलिसांना सुपूर्द केले आहे.

संबंधित निवासी आश्रम शाळा ही 2003 पासून कार्यरत आहे. परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा आणि महिला अधिक्षिका देखील आहे. समाजकल्याण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या या शाळेसंदर्भातील या घटनेनंतर विभागाच्या एका पथकाने शाळेला भेट देत चौकश. केली आहे. यासंदर्भातील अहवाल अपेक्षित असून त्यानंतर शाळेवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक तपासासाठी महिला अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणूक

दरम्यान वरोरा क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात 2 महिला अधिकारी असलेल्या एका विशेष तपास पथकाची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधून आणखी कुणी पीडित आहे का? याबाबत शोध घेतला जाणार आहे. शालेय व्यवस्थापनाच्या जीवावर आपल्या लहानग्या मुली शिक्षण घेण्यासाठी पालक पाठवतात. मात्र, काही नराधमांच्या वासनेचं शिकार बालिकांना व्हावं लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापासह भीतीचे वातावरण देखील आहे. आता या नराधम अधीक्षकाने आणखी इतर मुलींच्या अब्रूवर हात घातले आहे का? याची सखोल माहिती संबंधित पथक करणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in