
मुंबई- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं होतं.
अपघातानंतर त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सीआयडीद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
विनायक मेटेंचा मृतदेहं सांगत होता की त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात आणंलं गेलं नाही. मी डॉक्टर असल्यानं माझ्या ते लक्षात आलं. अपघात झाल्यानंतर दीड ते दोन तासांनी त्यांना रुग्णालयात आणलं गेल्याचा गंभीर आरोप ज्योती मेटे यांनी केला होता.
पुढे त्या म्हणाल्या होत्या ''मी चौकशीची मागणी करणार आहे. कारण यामध्ये काही फॉलप्ले नसला तरी मला अपघात कसा झाला हे कळण गरजेचं आहे. अपघात नेमका कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर माहिती देण्यात आली या गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली पाहिजे.'' रुग्णवाहिकेचा नंबर संगळ्यांकडे असतो, ड्रायव्हर फोन करु शकला असता, तो आम्हाला अपघाताचं नेमकं लोकेशन देत नव्हता असा धक्कादायक आरोप ज्योती मेटे यांनी केला आहे. त्याने जर आम्हाला लोकेशन दिले असते तर आम्ही वैद्यकीय मदत पाठवू शकलो असतो. त्यामुळे मी चौकशीची मागणी करणार असल्याचं ज्योती मेटे म्हणाल्या.
दरम्यान शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांचा घात की अपघात? असा संशय कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने मेटेंच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याने त्याचे पदं स्थगित करण्यात आले आहे. तसं पत्रक महेबूब शेख यांनी काढलं आहे.