निर्णय झाला! महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून होणार सुरू; 'या' नियमांचं करावं लागणार पालन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती : 50 टक्के क्षमतेनं महाविद्यालये होणार सुरू : वसतिगृह टप्प्याटप्प्यान करणार सुरू
निर्णय झाला! महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून होणार सुरू; 'या' नियमांचं करावं लागणार पालन

राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. यावेळी सामंत यांनी महाविद्यालयांसाठीची मार्गदर्शन नियमावलीही जाहीर केली.

महाविद्यालये सुरू करतासाठीची नियमावली आम्ही तयार केली आहे. सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना ती पाठवण्यात येणार आहे. त्यानुसारच 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेनं महाविद्यालय सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिला आहे, असं सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

'वसतीगृहं टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहतुकीचे मुख्य साधन लोकल ट्रेन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

काय आहे नियमावली? कोणत्या विद्यार्थ्यांना मिळवणार प्रवेश?

१) कोरोना संसर्ग कमी झालेल्या ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त क्षमतेनं महाविद्यालय सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी.

२) विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यात बोलावण्यात यावं.

३) कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं नसेल तर विद्यापीठ, महाविद्यालयाने पुढाकार घेऊन स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवावे.

४) ज्या परिसरात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुनच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा.

५) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी विद्यापीठं, महाविद्यालयांकडे असेल. परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.

६) जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांना करुन द्यावी लागणार.

७) टप्प्याटप्प्याने वसतीगृह सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी.

८) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सूचना.

९) दोन डोस घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी कोरोना नियम पाळणं बंधनकारक.

१०) 18 वर्षा खालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही

Related Stories

No stories found.