देवेंद्र फडणवीसांना जेंव्हा ग्रामस्थ महिला ठणकावून सांगते 'कागदावर लिहून द्या...'

वर्ध्यातील पुरग्रस्थ भागाच्या पाहणी दौऱ्यातील घटना
वर्धा पूरग्रस्थ पाहणी दौरा
वर्धा पूरग्रस्थ पाहणी दौरा

वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे लोकांचे हाल होत आहेत. अनेक गावातील लोकांना आपले घरे सोडून सुरक्षितस्थळी रिलीफ कम्पमध्ये वास्तव्य करावं लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. यादरम्यान ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला. त्यापैकी एका महिलेने आमचं पुनर्वसन कराच आणि तसं लिहून द्या, असं ठणकावून सांगितल्याचं कान्होली या गावात पाहायला मिळालं. त्यामुळे या महिलेकडे सर्वजण अवाक होऊन पाहत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

अतिवृष्टीमुळे शेती, घर यासह मोठ्याप्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. या सगळ्या व्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ग्रामस्थांनी मांडल्या. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान हिंगणघाट येथील मोहता हायस्कुलमध्ये ठेवण्यात आलेल्या पुरग्रस्तांची फडणवीसांनी भेट घेतली. फडणवीसांनी पुरग्रस्थांमध्ये बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, माजी आमदार राजु तिमांडे, आमदार रामदास आंबटकर यांची उपस्थिती होती.

यादरम्यान पूर परिस्थितीत मनस्थिती हरवून बसलेल्या युवकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गर्दीतच भोवळ आली. त्याच्यावर डॉक्टरने तेथेच प्राथमिक उपचार केले. नंतर त्याला हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर तेथील एका पूरग्रस्त महिलेने पुढे येत फडणवीसांकडे काही मागण्या केल्या. जुन्या वस्तीत आम्हाला पक्के घरे बांधून आमचं पुनर्वसन करा. आम्हाला तसं दोन शब्द लिहून द्या. आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे, असं ठणकावून त्या महिलेने सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

या महिलेच्या बोलण्याला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी सोबत असलेल्या जिल्हाधिकारी यांना पुनर्वसनाबाबत लागलीच प्रस्ताव तयार करा, असे आदेश दिले. त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, शेतीसह मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. या सर्वांना लवकरच मदत केली जाईल. वेळ पडल्यास जीआरमध्ये बदल करण्यात येईल पण प्रत्येकाला वेळीच मदत दिली जाईल, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in