मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह विधान : धुळे कोर्टाकडून नारायण राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर

सत्र न्यायाधीश आर.एच.मोहम्मद यांनी सुनावणीदरम्यान राणेंना जामीन मंजूर केला
मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह विधान : धुळे कोर्टाकडून नारायण राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर

जनआशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलासा मिळाला आहे. धुळे येथील सत्र न्यायालयाने नारायण राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिवसैनिकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन राणे यांच्याविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल झाला होता.

नारायण राणेंकडून वकील अनिकेत निकम यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला. सरकारी वकील सोनावणे यांनी पोलिसांची बाजू मांडली. “राणेंनी कोणताही कायदा हातात घेतलेला नाही. त्यांनी कोणत्याही गटाला अथवा वर्गाला चिथावणी दिलेली नाही. राज्य सरकारने राणेंच्या विरोधात एकाच प्रकारच्या एफआयआर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल केल्या आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणची कलमे वेगळी असून, यात राजकीय हेतू दिसत आहे. राणे हे केंद्रीय मंत्री असून, ते फरार होण्याची भीती नाही. पोलिसांनी त्यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा”, अशी मागणी अनिकेत निकम यांनी केली.

सत्र न्यायाधीश आर.एच.मोहम्मद यांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर नारायण राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या डोक्यावर असलेली अटकेची टांगती तलवार आता बाजूला झालेली आहे.

महाड येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून नारायण राणेंनी, मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणेंविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. 24 ऑगस्टला रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केल्यानंतर महाड न्यायालयासमोर सादर केलं. ज्यावेळी न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला होता.

Related Stories

No stories found.