पूजाची आत्महत्या ते राठोड यांचा राजीनामा, वाचा काय काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने आत्महत्या केली आणि त्यानंतर दोनच दिवसात या प्रकरणात आरोप झाला तो संजय राठोड यांच्यावर. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला तो भाजपकडून. याचं सगळ्यात महत्तवाचं कारण होतं ते म्हणजे व्हायरल झालेल्या १२ ऑडिओ क्लिप्स. या बारा ऑडिओ क्लिप्समधला एक आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर भाजपने सुरू केली ती त्यांच्या राजीनाम्याची मागणी.

७ फेब्रुवारीच्या रात्री पूजा चव्हाणने आत्महत्या केली. आज २८ फेब्रुवारी आहे. २८ फेब्रुवारीला म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या २२ दिवसांच्या कालावधीत काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

७ फेब्रुवारीला बातमी आली ती पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याची. पूजा चव्हाण ही फेमस टिकटॉक स्टार होती. ती मूळची परळीची होती. तिने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या मृत्यूची बातमी चांगलीच चर्चेत आली. तसंच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही पूजा चव्हाणची आत्महत्या झाली आहे याबद्दल ट्विट केलं.

पूजा चव्हाण पुण्यात आली होती. पूजा तिथे इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच दोन दिवसात व्हायरल झाल्या त्या बारा ऑडिओ क्लिप्स. या बारा ऑडिओ क्लिप्समध्ये जो उल्लेख आहे त्यानुसार एक आवाज होता तो अरूण राठोडचा. अरूण राठोड ज्या व्यक्तीशी या ऑडिओ क्लिपमध्ये बोलतो आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून संजय राठोड आहेत असा दावा भाजपने केला. तसंच पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध आहे असाही आरोप भाजपने करण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

संजय राठोड नॉट रिचेबल

पूजा चव्हाणची आत्महत्या झाल्याच्या दिवसापासून संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. संजय राठोड कुठे आहेत त्यांचा फोन का नॉट रिचेबल आहे असेही प्रश्न भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केले. या प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनीही या बारा ऑडिओ क्लिप्सचा उल्लेख करत संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी योग्य तपास सुरू आहे, पुणे पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात समोर आलेल्या बारा ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे त्यांना गांभीर्य समजेल अशी प्रतिक्रिया दिली. या सगळ्या घडामोडी घडत असताना संजय राठोड हे नॉट रिचेबलच होते. त्यांची पाठराखण सुरूवातीला कुणीही केली नाही. त्यानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी पक्षातूनच म्हणजेच शिवसेनेतूनच दबाव आहे अशाही काही बातम्या आल्या. ७ तारीख ते जवळपास २० तारखेपर्यंत याच सगळ्या गोष्टी म्हणजेच आरोप-प्रत्यारोपच सुरू होते.

साधारण १६ ते १९ तारखेच्या दरम्यान कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याच्याही बातम्या समोर आल्या. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारीच्या रविवारी महाराष्ट्राशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला. कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत याबद्दल काळजी व्यक्त केली. तसंच एक महत्त्वाचं आवाहनही केलं की सगळ्या मंत्र्यांनी, विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे नियोजित दौरे, कार्यक्रम, सभा, मोर्चे हे रद्द करावं कोरोना पसरतो आहे गर्दी करू होऊ नये आणि तो आणखी पसरू नये या दृष्टीने हे आवाहन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले.

एकीकडे कोरोना वाढत होता, विदर्भातले जिल्हे हे हॉटस्पॉट ठरू लागले होते. तरीही संजय राठोड प्रकरण सुरू होतंच. त्यानंतर संजय राठोड हे २३ तारखेला पोहरा देवी या ठिकाणी येणार अशी बातमी समोर आली. त्याप्रमाणे २३ तारखेला संजय राठोड हे वाशिम येथील पोहरा देवी या ठिकाणी पोहचले. पोहरा देवी हे बंजारा समाजाचं अत्यंत पवित्र तीर्थ स्थळ समजलं जातं तिथे असलेल्या सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी संजय राठोड २३ फेब्रुवारीला या ठिकाणी पोहचले. संजय राठोड यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. तसंच त्यांना समर्थन देणारे हजारो कार्यकर्ते पोहरा देवी या ठिकाणी जमले. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर टीका सुरू झाली ती मुख्यमंत्र्यांच्याच आवाहनाला हरताळ फासल्याची.

पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड काय म्हणाले?

पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे असं वक्तव्य केलं. तसंच या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र विरोधकांकडून मला बदनाम केलं जातं आहे. माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे अशी प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं.

संजय राठोड यांनी केलेल्या या शक्तीप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्याही बातम्या समोर आल्या. मात्र २४ तारखेला संजय राठोड हे कॅबिनेटच्या बैठकीलाही हजर राहिले. त्याच संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. २४ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संजय राठोड गेले त्यावेळीही ते राजीनामा देतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आला. मात्र तसं काहीही झालं नाही.

चित्रा वाघ आक्रमक

संजय राठोड यांच्याविरोधात भाजपच्या चित्रा वाघ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहण्यास मिळालं. चित्रा वाघ या पुण्यातील वानवाडी पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी पोलिसांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अजून गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न विचारला. त्यावेळी पोलिसांनी जो उर्मटपणा त्यांच्यासोबत केला तोदेखील चित्रा वाघ यांनी मीडियासमोर आणला.

शनिवारी म्हणजेच २७ फेब्रुवारीला त्यांनी नाशिकमध्येही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की संजय राठोड यांना मुळीच माफ करू नका. एवढंच नाही तर सरकारमधले मंत्री एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत अशीही टीका केली. इतर कुणाकडून नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे कारण ते एकटेच संवेदनशील आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

तसंच त्यांनी अरूण राठोड आणि विलास चव्हाणचं काय झालं हे प्रश्नही उपस्थित केले. संजय राठोड प्रकरणावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. एवढंच नाही तर संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशीही मागणी चित्रा वाघ यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राठोड प्रकरणात २७ फेब्रुवारीला जेव्हा चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले तेव्हा त्याबद्दल संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत सूचक होतं. उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत ते कुणालाही पाठिशी घालणार नाहीत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १ मार्चपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होतं आहे. त्याआधीच संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाईल अशा चर्चा होत्या. अखेर तो राजीनामा घेतला गेला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात झालेले गंभीर आरोप तसंच पोहरादेवी या ठिकाणी केलेलं शक्तीप्रदर्शन या दोन्ही गोष्टी संजय राठोड यांना भोवल्या आहेत. त्यामुळे संजय राठोड यांना वनमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. आता हे प्रकरण पुढच्या कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT