Savarkar: उद्धव ठाकरे खिंडीत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेरलं, केला सवाल
Eknath Shinde asked uddhav Thackeray what will you do : राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे. शिंदेंनी ठाकरेंना सवाल केला आहे…
ADVERTISEMENT

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांबद्दल अपमानजनक बोलू नका असा इशारा दिला. मात्र, आता याच मुद्द्यावरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सवाल करत घेरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत घेत ठाकरेंचा नामोल्लेख टाळत टोले लगावले.
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतोय. त्याचा खरा म्हणजे निषेध करावा तितका कमी. मी त्याचा जाहीर धिक्कार करतो. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आंदोलन करत असताना काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.”
हेही वाचा – ‘Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर…’ : बावनकुळेंनी ललकारलं
“देशभक्ताच्या, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेतोय. त्याचमुळे या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशाभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी जो त्याग केला, स्वातंत्र्य मिळवलं. त्यांचा जाणीवपूर्वक अवमान, अपमान करण्याचा निंदनीय प्रयत्न केला जातो. त्याचा निषेध देशभरातून होतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सावरकर होण्याची लायकी नाही, राहुल गांधींवर शिंदेंची टीका
“राहुल गांधींनी एक दिवस स्वातंत्र्यावीर सावरकर ज्या सेल्युलर जेलमध्ये होते, तिथे एक दिवस राहून आले की, त्यांना जाणीव होईल. पण, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यांच्या कृत्याचा निषेध करावा तितका कमी आहे. त्याचा निषेध सगळ्यांनी करायला हवा होता. ते वारंवार सांगताहेत की ते सावरकर नाही, गांधी आहेत. सावरकर होण्याची लायकी नाही. सावरकरांसारखा त्याग तुमच्यात नाही. सावरकर व्हायला, या देशाबद्दल प्रेम असायला पाहिजे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली.










