शिंदे गटाने फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी ठेवली; शिवसेनेनं काय म्हटलंय?

eknath shinde cabinet expansion : संजय राठोडांना मंत्री केल्यावरून शिवसेनेनं भाजप पकडलं कात्रीत
shiv sena, saamana editorial on eknath shinde led maharashtra cabinet expansion
shiv sena, saamana editorial on eknath shinde led maharashtra cabinet expansion

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. ९ ऑगस्ट रोजी १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. संजय राठोड यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं राजकारण तापलं आहे. तब्बल महिनाभरानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेनं खोचक सवाल करत भाष्य केलं आहे.

शिवसेनेनं 'सामना' अग्रलेखात म्हटलं आहे, "अखेर 40 दिवसांनंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले, पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही. भाजप व शिंदे गट मिळून 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता. फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण राज्यपाल महोदयांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपथ दिली व आता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे", असं शिवसेनेनं सामनात लिहिलेल्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Maharashtra Cabinet Expansion : "शिंदे-फडणवीसांना विलंब का लागला?"

"शिंदे-फडणवीसांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर मंत्रिमंडळ विस्तारास इतका विलंब का लागला? आता ही परिस्थिती व घटनात्मक पेच कायम असताना या मंडळींनी शपथ घेतली. मग हीच शपथ त्यांनी आधी का घेतली नाही? फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ निर्माण होईल. 12 ऑगस्टला आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात ‘जजमेंट डे’ आहे. म्हणजे निकाल येईल व त्याआधी हा शपथविधी संपन्न होत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भीती नाही. सर्वकाही मनाप्रमाणे होईल, असा आत्मविश्वास फसफसून बाहेर पडला आहे. तो कशाच्या जोरावर?", असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

"राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा अशा मंडळींनी भाजपकडून शपथा घेतल्या. शिंदे गटाकडून संदिपान भुमरे, संजय राठोड, दादा भुसे, गुलाब पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत, शंभुराज देसाई, दीपक केसरकर अशांचे घोडे गंगेत न्हाले, पण गंगेत डुबकी मारून तरी यांच्या विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय?", असा सवाल शिवसेनेनं शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.

"दीपक केसरकर विरुद्ध राणे, गुलाबराव पाटील विरुद्ध चिमणराव पाटील"

"महाराष्ट्रास अर्धेमुर्धे मंत्रिमंडळ लाभले आहे इतकेच, पण ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते किती काळ गप्प बसतील, हाच खरा प्रश्न आहे! जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध चिमण पाटलांत ‘राडा’ होणारच आहे. सावंतवाडीत दीपक केसरकर यांची लायकी राणेंच्या मुलांनी काढल्यावर केसरकर कोशात गेले आहेत, पण शिंदे यांनी कोशातून बाहेर काढून केसरकरांना मंत्रिपदाची शपथ दिली. आता सिंधुदुर्गात राणे विरुद्ध केसरकर या जुन्याच भांडणाला नवा रंग चढेल. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या दोन्ही बाजूंचे नऊ-नऊ असे मंत्री घेतले. हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ राज्याच्या कल्याणासाठी नक्की काय करणार आहे?", असा प्रश्न शिवसेनेनं सरकारला केला आहे.

"शिंदे गटाचे जे लोक मंत्री झाले ते महाविकास आघाडीतही मंत्री होतेच. त्यातील राठोड यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप भाजपनेच केले होते. भाजपच्या आरोपांमुळेच राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले होते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात राठोड यांना सळो की पळो करून सोडले. आता तेच राठोड फडणवीस यांच्या मांडीस मांडी लावून बसतील. भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून त्यांना स्वच्छ करण्यात आले", अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

"किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामीच आहे. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे. विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना."

"क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?", असं म्हणत शिवसेनेनं बंडखोर आमदारांसह भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in