Exclusive: मोदींमुळे तुमची भरभराट झाली?, गौतम अदाणी म्हणाले हे तर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज चेंगप्पा, ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग), इंडिया टुडे ग्रुप

PM Modi and Gautam Adani: नवी दिल्ली: देशातील सर्वात यशस्वी उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी इंडिया टुडेला (India Today) दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत (Exclusive Interview) पंतप्रधान मोदींबाबत (PM Modi) काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याबाबत त्यांनीही अगदी खुलेपणाने उत्तरं दिलं आहेत. (exclusive interview did pm modi make you financially prosperous see gautam adanis answer)

जेव्हापासून देशात मोदी सरकार आलं तेव्हापासून अनेकांनी अदाणी आणि त्यांच्या उद्योग समूहावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदींमुळेच अदाणींची भरभराट झाली आहे अशी टीका अनेक जण करतात. याच टीकेला आता स्वत: गौतम अदाणींनी इंडिया टुडेला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीतून प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा नेमकं अदाणी काय म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रश्न: गौतम भाई, तुमचा जो आर्थिक विकास झालाय किंवा तुमची जी आर्थिक उलाढाल वाढली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झाली आहे. असे म्हणणाऱ्या टीकाकारांना तुम्ही कसे उत्तर द्याल?

गौतम अदाणी: पंतप्रधान मोदी आणि मी एकाच राज्यातून येतो. त्यामुळे मी अशा बिनबुडाच्या आरोपांचे सोपे लक्ष्य बनतो.

ADVERTISEMENT

जेव्हा मी माझ्या उद्योजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहतो तेव्हा मी त्याचे विभाजन चार टप्प्यात करु शकतो. हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल की, हे सर्व राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुरू झाले जेव्हा त्यांनी प्रथमच एक्झिम धोरणात उदारीकरण आणलं आणि अनेक वस्तू या पहिल्यांदाच ओजीएल सूचीमध्ये (OGL List) आणल्या गेल्या. यामुळे मला माझे एक्सपोर्ट हाऊस सुरू करण्यास मदत झाली. म्हणूनच, त्यावेळी राजीव गांधींशिवाय माझा उद्योजक म्हणून प्रवास कधीच सुरू झाला नसता.

ADVERTISEMENT

मला दुसरा मोठी संधी ही 1991 मध्ये मिळाली, जेव्हा नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या जोडीने मोठ्या आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. इतर अनेक उद्योजकांप्रमाणेच मीही त्या सुधारणांचा लाभार्थी होतो. त्याबद्दल अधिक विस्ताराने सांगण्यात अर्थ नाही कारण त्याबद्दल बरेच काही बोलले गेले आहे आणि लिहिले गेले आहे.

माझ्यासाठी तिसरा टर्निंग पॉइंट हा 1995 साली आला. जेव्हा केशुभाई पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तोपर्यंत, गुजरातमधील सर्व विकास  मुंबई ते दिल्ली NH 8च्या आसपास असणाऱ्या वापी, अंकलेश्वर, भरूच, सिल्वासा, वडोदरा, सुरत आणि अहमदाबाद या शहरांमध्येच केंद्रित होता. पण केशुभाई हे दूरदर्शी होते. त्यामुळे त्यांचा भर हा किनारपट्टीच्या विकासावर होता– आणि हे तेच धोरणात्मक बदल होते की, ज्यामुळे मी मुंद्रा येथे गेलो आणि तिथे माझे पहिले बंदर बनवण्याची प्रेरणा मिळाली.

Exclusive Interview: NDTV च्या प्रश्नावर गौतम अदाणी स्पष्टच म्हणाले, मी त्यात…

चौथा टर्निंग पॉइंट हा 2001 साली आला, जेव्हा गुजरातने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत केले. नरेंद्र मोदी यांची धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे केवळ राज्याची आर्थिक परिस्थितीच बदलली नाही तर सामाजिक परिवर्तन आणि पूर्वीच्या अविकसित भागांचा देखील विकास झाला. यामुळे उद्योग आणि रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढला. जो यापूर्वी कधीही वाढला नव्हता. आज, त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारची कामगिरी करत असल्याचे आपण पाहत आहोत, जिथे आता एक नवा भारत प्रस्थापित होतोय.

पण हे दुर्दैवी आहे की, काही गोष्टी या माझ्या विरोधात थोपवल्या जातात. मी आधीच स्पष्ट केलं आहे की, मोदींवरुन जे हे आरोप निराधार आहेत आणि आमच्या समूहाचे यश पाहता ते पूर्वग्रह दूषित असेच आहेत. वस्तुस्थिती ही आहे की, माझे व्यावसायिक यश हे कोणा एका नेत्यामुळे नाही तर तीन दशकांहून अधिक काळातील अनेक नेत्यांनी आणि सरकारांनी अवलंबलेल्या धोरण आणि संस्थात्मक सुधारणांमुळे आहे.

असं प्रत्युत्तर गौतम अदाणी यांनी यावेळी आपल्या विरोधकांना दिलं आहे.

प्रश्न: जर तुम्ही तुमच्या टर्निंग पॉइंट्सकडे पाहिले तर ते राजकीय स्पेक्ट्रममध्ये पसरलेले दिसून येते ना की, कोणत्याही एका विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाबाबत. पण तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आणि गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास तुम्ही पाहिला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वशैलीबद्दल काय सांगाल?

गौतम अदाणी: पंतप्रधान मोदींनी भारताला दूरदर्शी आणि प्रेरणादायी नेतृत्व दिलेलं आहे. त्यांनी केवळ महत्त्वाचे धोरणात्मक बदलच केले नाहीत तर विविध कार्यक्रम आणि योजनांद्वारे प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर थेट परिणाम केला आहे. प्रशासनाचा असा क्वचितच पैलू असेल ज्याला त्यांनी स्पर्श केला नसेल.

ते केवळ भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तनवादी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील नाहीत तर सामाजिक परिवर्तन आणि सर्वसमावेशक वाढीसाठीही ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण योजना आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला जोरदार चालनाही दिली आहे. जसं की, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया सारख्या योजनांनी आर्थिक गुणक म्हणून काम केले आहे. त्यांनी केवळ व्यवसाय आणि उत्पादन संधी निर्माण केल्या नाहीत तर लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देखील निर्माण केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सामाजिक क्षेत्र, कृषी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अविकसित क्षेत्रांवर तितकेच लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामुळे विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत असल्याचे सुनिश्चित झाले आहे. स्वच्छ भारत, जन धन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि आयुष्मान भारत यांसारख्या त्यांच्या योजनांनी भारतात एक मोठा बदल घडवून आणला आहे.

Exclusive: गौतम अदाणी असे बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, वाचा संपूर्ण मुलाखत

असं म्हणत गौतम अदाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबाबत आणि व्हिजनचं प्रचंड कौतुक केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT