अमरावती : नियमांचा भंग करणाऱ्या चार हॉस्पिटल्सवर कारवाईची शिफारस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे विदर्भात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होते आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या भागात लॉकडाऊनसह अनेक निर्बंध घातले आहेत. अमरावतीत आरोग्य यंत्रणांवर पुन्हा एकदा ताण आलेला असताना…कोरोनाच्या नियमांचा भंग करणाऱ्या चार हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची शिफारस तपासणी पथकाने केली आहे. अमरावतीमधील हिलटॉप हॉस्पिटल, अंबादेवी हॉस्पिटल, रेनबो हॉस्पिटल, आणि सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा यात समावेश आहे.

सामान्य नागरिकांकडून ज्यादा पैसे उकळण्यापासून इतर नियमांचं उल्लंघनही इकडे होताना तपासणी पथकाला लक्षात आलं. रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील वाठोडे व जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप यांच्या पथकाने विविध रुग्णालयांची तपासणी केली. त्यानुसार दोषी आढळलेल्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची शिफारस महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

पथकाने केलेल्या तपासणीत, हिल टॉप रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या सिझरीयन सेक्शन शस्त्रक्रियेसाठी नियमाप्रमाणे ५३ हजार रुपये आकारण्याऐवजी ८६ हजार ६०० रुपये आकारल्याचे आढळले. त्या देयकात ‘हिलटॉप’ने नियमभंग करून ६ दिवसांचे चार हजार प्रतिदिवसप्रमाणे २४ हजार रूपये अतिरिक्त आकारल्याचे आढळले. शासकीय दरपत्रकही तिथे लावलेले नव्हते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंबादेवी कोविड हॉस्पिटलमध्ये बिलिंग सेक्शन, स्वागत कक्ष हा कोविड रुग्णांच्या उपचारासाठीच्या वॉर्डमध्येच आढळला. रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी आदी देण्यासाठी जनरल वॉर्डमधून थेट प्रवेश असल्याचे आढळले. पीपीई किट व औषधाचे रिक्त खोके जाळून नष्ट केल्याचे दिसून आले, असे निरीक्षण पथकाने नोंदवले आहे. रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड हॉस्पिटल येथे पीपीई कीटचा उल्लेख नसलेले जुनेच दरपत्रक चिटकवलेले होते. ‘रेनबो’ने रुग्णांकडून शुगर, ईसीजी, इंट्युबेशन आदीसाठी नियमबाह्यरीत्या जास्तीचे दर आकारले. काही रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर ‘आयसीयु’तून विलगीकरण कक्षात आणल्यावर तेथील दरही ‘आयसीयु’सारखेच अधिक लावले, असे पथकाने नोंदवले आहे.

‘सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड केअर सेंटर’ला पथकाने वारंवार मागणी करूनही व खूप प्रतीक्षा करूनही बिलबुक तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही. पथकाला बराच वेळ ताटकळत ठेवल्यावर तेथील महिला कर्मचाऱ्याने पावती क्रमांक ४२३ ते ५०० असलेले बिलबुक क्रमांक पाच तपासणीसाठी उपलब्ध करून दिले. त्यात २२ पावत्या काढून टाकून पुरावा नष्ट केल्याचे आढळले. पथकाने पावतीपुस्तक जप्त केले. तपासणी प्रक्रिया आटोपल्यावर सायंकाळी सर्व देयके प्रिंटआऊट काढून तयार असल्याचा तेथील डॉक्टरांचा फोन पथकाला आला, असेही अहवालात नमूद आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हॉस्पिटल्सकडून होणारा नियमांचा भंगाबद्दल सामान्य जनतेमध्ये रोष पहायला मिळाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT