
स्वाती चिखलीकर, सांगली: सांगलीतील एका स्टंटबाज तरुणाने चक्क नागाला किस केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. अर्थात वनविभागाला काही हा प्रकार रुचला नाही आणि त्यांनी या स्टंटबाज तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
खरं तर नाग पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. पण सांगलीतील प्रदीप अडसुळे मात्र नागासोबत जीवघेणे स्टंट करत फिरतो. तो एवढ्यावरच थांबत नाही तर प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे सगळे या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियावर पोस्ट देखील करतो. पण आता हाच प्रकार त्याला महागात पडला आहे.
आज (29 मार्च) मौजे बावची ता. वाळवा जिल्हा सांगली येथील प्रदीप अशोक अडसुळे (वय 22 वर्ष) याने नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. पण याच व्हीडिओच्या आधारे वन विभागाने त्याच्यावर कारवाई करत त्याचे वर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई विजय माने उपवनसंरक्षक सांगली, डॉ. अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा, सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर व अमोल साठे वनरक्षक बावची व निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
विषारी सापाशी खेळ, युवकाने गमावले प्राण;
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अशाच प्रकारे विषारी सापाशी खेळ करणं एका 20 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं होतं. ठाणेनजीक असलेल्या मुंब्र्यातील संजयनगर येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाला सर्पदंशाने जीव गमवावा लागला होता.
मोहम्मद शेख नावाचा एक युवक टाईमपास करण्यासाठी मुंब्रा बायपास येथे आला होता. त्याचवेळी त्याला लाल किला ढाब्याजवळ एक अत्यंत विषारी साप दिसला. मुंब्रा परिसरातील डोंगराळ भाग असल्याने व डोंगरातच झोपड्या बांधल्याने पावसात अनेक वन्यजीव इथल्या वस्त्यांमध्ये घुसतात. त्यामुळे इथे साप दिसल्याने मोहम्मदने त्याला कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय पकडलं.
यावेळी मोहमदने फक्त सापला पकडलंच नाही तर सापाचे डोके आपल्या हातात धरून सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळले. केवळ मजा म्हणून तो अशा प्रकारचं कृत्य करत होता. त्यावेळी त्याला हे देखील माहिती नव्हतं की, हा साप किती विषारी आहे.
त्यामुळे मोहम्मद गळ्यात साप अडकवून त्याच अवस्थेत गावदेवी मार्केट परिसरात तो फिरत होता. यावेळी अनेकांनी त्याला हटकलं देखील होतं. तसंच सापाला सोडून देण्यासही सांगितलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे, मोहम्मदचे मित्र त्याचे हे सगळे कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते.
दरम्यान, सापासोबत खेळता-खेळता मोहम्मदची सापावरची पकड सैल झाली होती आणि सापाने त्याला तब्बल तीन वेळा चावा घेतला होता. परंतु त्यावेळी त्याला काहीच जाणवलं नव्हतं. काही वेळाने त्याने सापाला एका झुडपात सोडून दिलं.
पण सर्पदंशामुळे काही वेळाने मोहम्मदच्या शरीरात विष भिनलं आणि त्याला प्रचंड त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळेच अतिउत्साही तरुणांनी अशाप्रकारचे जीवावर बेतणारे स्टंट करु नये असं आवाहन सातत्याने वनविभागाकडून देखील करण्यात येतं.