कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?

वाचा सविस्तर कुणाला कशी अटक करण्यात आली?
कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातला एकजण महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या सगळ्यांना दहशतवादी कारवाया, घातपात स्फोट आणि हत्या घडवून आणायच्या होत्या हे त्यांच्या अटकेनंतर स्पष्ट झालं आहे.

जान मोहम्मद शेख उर्फ समीर शेख, ओसामा सामी, मूलचंद, झिशान कमर, मोहम्मद आमीर जावेद, अबू बकर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावं आहेत. जान मोहम्मदला मुंबईचा ओसामा सामी दिल्लीचा , मुलचंदला रायबरेलीचा, झिशान कमरला प्रयागराजमधून, मोहम्मद आमीर जावेद लखनऊचा आहे. तर अबू बकर आणि झिशान या दोघांनी पाकिस्तानात पंधरा दिवस ट्रेनिंग घेतल्याचंही समोर आलं आहे.

झिशान कमरला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक करण्यात आली. त्याने MBA केलं आहे. तो दुबईमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करत होता. लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा तो भारतात आला आणि त्याने खजुरांचा व्यवसाय सुरू केला.

जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया हा मुंबई पोलिसांच्या रडारवर गेल्या अनेक वर्षांपासून होता. एका मारहाण प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. तो पेशाने ड्रायव्हर म्हणून काम करतो.

मोहम्मद आमीर जावेदला लखनऊमधून अटक करण्यात आली. आमीर हा एक अध्यात्मिक गुरू म्हणून काम करतो. जेद्दाहमधे त्याने बराच काळ घालवला आहे.

मूलचंद उर्फ लाला हा पेशाने शेतकरी आहे, मात्र त्याचे संबंध डी कंपनीशी आहेत. मोहम्मद अबू बकर हा देखील जेद्दाहमधे होता. नंतर भारतात परतला त्यानंतर 2013 मध्ये देवबंद येथील मदरशामध्ये अध्यात्मिक शिक्षण घेतलं.

ओसामा सामीचं कुटुंब सुका मेवा विक्रीचा व्यवसाय करतं. त्यामुळे ओसामा सामी हा अनेकदा मध्य आशियातील देशांमध्ये गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओसामा मस्कतला गेला आणि तिथून जलमार्गे पाकिस्तानला पोहचला.

D कंपनीची लिंक काय?

जान मोहम्मदचं नाव तेव्हा समोर आलं जेव्हा फझलू रेहमान खान अलियास मुज्जूला अटक करण्यात आली. मुज्जू हा दाऊदचा खास आहे. मुज्जू आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना दक्षिण मुंबईतल्या एका व्यावसायिकाचा खून करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अनिस इब्राहिम म्हणजेच दाऊदच्या भावासाठी मुज्जू ही हत्या करणार होता. फझलू रहमान हा त्याच्या जवळच्या साथीदारांमध्ये दाऊदचा खास आणि बंदुकीने निशाणा साधणारा म्हणून ओळखला जातो. फहीम मचमचसाठी आणि अनिससाठी तो काम करतो. आता या कटाच्या वेळी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाला अनिसने शस्त्रांच्या आणि स्फोटकांच्या डिलिव्हरीचं काम दिलं होतं.

खरं तर जान मोहम्मदवर मुंबई पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो अंडरवर्ल्डशी आपण काहीही संबंधित नाही हे दाखवण्यात यशस्वी झाला होता. फहीम मचमचचा मागील महिन्यात मृत्यू झाला तोपर्यंत जान मोहम्मद त्याच्यासाठी स्लीपर सेलप्रमाणे काम करत होता असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in