Milind Teltumbde : जहाल नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 4 प्रमुख नक्षली नेत्यांचा खात्मा
लाल वर्तुळा दर्शवण्यात आलेल्या परिसरात झाली चकमक... जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे.

Milind Teltumbde : जहाल नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 4 प्रमुख नक्षली नेत्यांचा खात्मा

गडचिरोली पोलिसांचा नक्षल्यांवर मोठा प्रहार : शनिवारी दिवसभर चाललेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार

महाराष्ट्राच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या नक्षलवाद्यांवर शनिवारी पोलिसांना मोठा प्रहार केला. धानोरा तालुक्यातील हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० जवानांनी केलेल्या कारवाईत जहाल नक्षलवादी कमांडर आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह (Milind Teltumbde) 4 प्रमुख नक्षली नेते ठार झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांकडून मिलिंड तेलतुंबडे यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. (Milind Teltumbde killed in police encounter in Gadchiroli)

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह (Milind Teltumbde) इतर प्रमुख 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी 5 AK47 आणि इतर शस्त्रांसह दारुगोळा जप्त केला आहे. ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यांच्याकडून मिलिंद तेलतुंबडेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

मिलिंद तेलतुंबडेची शंभर टक्के ओळख पटवण्यासाठी मिलिंद तेलतुंबडेचे (Milind Teltumbde) रक्ताचे संबंध असलेल्या नातेवाईकाच्या (आनंद तेलतुंबडे) डीएनए चाचण्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 26 नक्षलवाद्याचे मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात येणार असून, दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

गडचिरोली जंगलात काय घडलं?

गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्रातंर्गत येणाऱ्या हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम सुरू असताना शनिवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती.

सी-60 चे जवान काही गावांमध्ये शोध मोहिम राबवत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 तुकड्या होत्या. घटनेनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. या धुमश्चक्रीत 26 नक्षलवादी ठार झाले असून, त्यात जहाल नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

वरच्या बाजूला हिंडकोटोला, तर अलोंदीच्या खालच्या बाजूला रानकट्टा.
वरच्या बाजूला हिंडकोटोला, तर अलोंदीच्या खालच्या बाजूला रानकट्टा.

ज्या जंगलात ही चकमक झाली, तो भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. विशेष म्हणजे रानकट्टा हे गाव गडचिरोली (महाराष्ट्र) जिल्ह्यात असून, हिंडकोटोला हे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्याच्या हद्दीत आहे.

सी-60 कमांडो नाव कसं पडलं?

गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवाद्यांच्या हालचालींसह अनेक कारवाया वाढत गेल्या. नक्षली हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नक्षल्यांचा बिमोड करण्याच्या उद्देशानं तत्कालीन पोलीस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती. या संख्येवरूनच हे नाव देण्यात आलं होतं. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग असे दोन भाग करण्यात आलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in