Sangali: मुलं चोरणारी टोळी समजून ऋषींना जबर मारहाण, पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील चार साधूंच्या टोळीला मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Sangali: मुलं चोरणारी टोळी समजून ऋषींना जबर मारहाण, पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली

सांगली: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील चार साधूंच्या टोळीला मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली आहे. हे चार साधू कर्नाटकातून जतमार्गे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जात होते. वाटेत लवंगा गावात रस्ता विचारण्यासाठी थांबले. त्यानंतर गावात एक अफवा पसरली की साधूंची टोळी मुले चोरण्यासाठी आली आहे. त्यानंतर सर्व गावकरी एकत्र आले. आणि त्यांनी साधूंना लाठ्या, चपला आणि हातात जे काही आले, त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीवरती पोलिसांचं काय म्हणाले?

जतच्या उमदी पोलीस ठाण्यात ही घटना उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली आणि नंतर कळले की, हे लोक मथुरा, उत्तर प्रदेश येथील पंच दशनाम पुराण आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री गर्वागिरी महाराज आणि कर्नाटकात तीर्थयात्रेसाठी गेलेले त्यांचे शिष्य आहेत. ते विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी जात होते. आणि ते ऋषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची आधारकार्डही तपासण्यात आली आणि त्यांच्या नातेवाईकांशीही पोलिसांकडून बोलणे झाले आहे. आतापर्यंत या साधूंनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.

ऋषींच्या मारहाणीनंतर काँग्रेसची भाजपवर टीका

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पालघरच्या घटनेची आठवण करुन देत भाजपवरती टीका केली आहे. ''पालघर साधू हत्याकांडात भाजपाच्या सत्तेतील गावातील भाजपा पदाधिकारी होते. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवेतून हत्या झाली असतानाही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपाने मविआची हिंदू विरोधी म्हणून बदनामी केली. त्याच अफवेतून जतमध्ये साधूंना मारहाण झाली. आता सरकार कोणाचे? सीबीआयकडे केस देणार का?'' असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

भाजप आमदार राम कदमांनीही दिली प्रतिक्रिया

सांगलीमध्ये जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हे बदलेलं सरकार आहे. हे काही पालघरमध्ये हत्याकांड घडल्यानंतर फेसबूक लाईव्ह मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार होतं तसं नाही. हे वर्तमान सरकार या साधूंवरती अन्याय करणार नाही. ही संतांची भूमी आहे आणि इथे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असं भाजप आमदार राम कदम म्हणाले आहेत.

पालघरमधील घटनेची पुनरावृत्ती टळली

16 एप्रिल 2020 रोजी डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील गडचिंचले येथील वनविभागाच्या चेकनाक्या जवळ एका इको कार मधून आलेल्या सुशीलगिरी महाराज, चिकने महाराज कल्पवृक्ष गिरी आणि त्यांच्या कारचा चालक निलेश तेलगडे ह्यांची जमावाने हत्या केली होती. ह्या प्रकरणी पोलिसांवर "स्लॅक सुपार्व्हिजन"चा ठपका ठेवीत तत्कालीन पोलीस अधीक्षक ह्यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत नंतर त्यांची बदली करण्यात आली होती. आता काल ऋषींना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ पाहता पालघर सारखी घटना टळली असं म्हणता येईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in