IRCTC New Rule: तिकीट बुकिंगचे नियम बदलले; व्हेरिफिकेशन सक्तीचं, तारीख बदलता येणार

व्हेरिफिकेशन सक्तीचं : प्रवासाची तारीखही बदलता येणार
रेल्वे तिकीट बुक करताना मोबाईल नंबर, ईमेल आयडीचं व्हेरिफिकेशन महत्त्वाचं...
रेल्वे तिकीट बुक करताना मोबाईल नंबर, ईमेल आयडीचं व्हेरिफिकेशन महत्त्वाचं...India Today

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रेल्वेतून प्रवास करण्याचा संबंधच आला नसेल. त्यामुळे त्यांना रेल्वे तिकीट बुक करताना काही नवीन गोष्टी कराव्या लागतील. कारण इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने तिकीट बुकिंगच्या नियमात अनेक बदल केले आहेत. या बदलांमुळे काही गोष्टी करणं आवश्यक झालं आहे. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेच्या बुक केल्या तिकीटात प्रवासासंबंधी बदलही करता येणार आहेत. तर जाणून घेऊया काय आहेत नवीन नियम...

रेल्वे तिकीट बुक करताना 'या' गोष्टींचं व्हेरिफिकेशन महत्त्वाचं

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी लॉग करावं लागतं. यासाठी आता स्वतः नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींची पडताळणी (व्हेरिफिकेशन) झाल्यानंतरच तिकीट बुक करता येणार आहे. IRCTC च्या पेजवर गेल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी नवीन पेज ओपन होईल. तिथे OTP च्या माध्यमातून तुमचा मोबाईल व ईमेल आयडी व्हेरिफिकेशन केलं जाईल.

तिकीट कॅन्सल न करता प्रवासाची तारीख बदलता येणार

अनेकवेळा असं होतं की, आपण तिकीट बुक करतो आणि प्लानमध्ये बदल होतो. अशा वेळी मग तिकीट कॅन्सल करावं लागतं आणि नवीन बुक करावं लागतं. यात पैसेही कापले जातात. पण, आता IRCTC ने म्हणजे रेल्वेनं केलेल्या नियमांत तिकीट कॅन्सल न करताही प्रवासाच्या तारखेत बदल करता येणार आहेत.

या नियमानुसार बुक केलेल्या तिकीटावरील तारीख अगोदरची घेऊ शकता किंवा नंतरचीही निवडू शकता. इतकंच नाही तर तुम्हाला ज्या स्टेशनवरून तुम्ही बसणार आहात. त्यामध्येही बदल करू शकता. यासाठी स्टेशनवरून तुम्ही रेल्वेत चढणार आहात. तेथील स्टेशन मास्तरच्या नावे अर्ज करावा लागेल. तो अर्ज घेऊन संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रावर जाऊन स्टेशनमध्ये बदल करू शकता. हा बदल प्रवासाच्या २४ तास आधी करता येणार आहे. ही सुविधा ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने बुक केलेल्या तिकीटांवर आहे.

प्रवासाच्या तारखेत बदल कसा करायचा?

प्रवास करण्याच्या तारखेत बदल झाला असेल, तर तुम्ही तिकीट त्याप्रमाण बदलू शकता. यासाठी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयात जाऊन तिकीट जमा करावं लागेल. तिथे तारखेत बदल करून मिळेल. पण, ही प्रक्रिया प्रवासाच्या ४८ तास अगोदर करावी लागणार असून, ही सुविधा फक्त ऑफलाईन पद्धतीने बुक केलेल्या तिकीटांसाठीच आहे.

तुमच्या तिकीटावर दुसऱ्या व्यक्तीला करता येणार प्रवास

तिकीट बुक केलेलं असले आणि तुमचा प्लान कॅन्सल झाला, तर तिकीट कॅन्सल करावं लागतं. पण, आता तुमचं तिकीट इतर व्यक्तीला देऊ शकता. त्या व्यक्तीला तुमच्या तिकीटावर प्रवास करता येऊ शकतो.

जर तुम्हाला तुमचं तिकीट इतर व्यक्तीला द्यायचं असेल, तर त्यासाठी २४ तास आधी रेल्वेकडे विनंती करावी लागेल. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी तिकीटाची प्रिंट काढा. त्यानंतर जवळच्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काऊंटरवर जा. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावे तिकीट करायचं आहे. त्या व्यक्तीचं ओळखपत्र (आधार वा मतदान कार्ड) त्यासोबत जोडा. ही प्रक्रिया केल्यानंतर तिकिट त्या व्यक्तीकडे ट्रान्स्फर होईल.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in