जळगाव: एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला

जळगाव: एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला
jalgaon eknath khadses daughter rohini khadse car attacked by unknown people

मनीष जोग, जळगाव: मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू असून त्यातच काल (27 डिसेंबर) रात्री राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी काही अज्ञातांकडून रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर खडसे समर्थकांची त्यांच्या घराजवळ बरीच गर्दी जमली होती.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या कारवर अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.

याप्रसंगी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा ड्रायव्हर असे एकूण तीन जण होते.

यावेळी अचानक मोठ्या दगडाच्या साह्याने त्यांच्या गाडीच्या काचेवर आघात करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना काहीही दुखापत झाली नाही. मात्र, हल्लेखोर काही क्षणात फरार झाले.

हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रंही होती असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

रुपाली चाकणकरांनी केला हल्ल्याचा निषेध

'रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापूर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी.' असं ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

मुक्ताईनगरात 25 डिसेंबर रोजी रात्री वाद होऊन परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावर रोहिणी खडसे माध्यमांशी बोलताना असं म्हणाल्या होत्या की, महिलांवर जर अशाच पध्दतीने अन्याय होत राहिला तर वेळप्रसंगी आमदाराला चोप देऊ अशी प्रतिक्रिया दिली होती.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुक्ताईनगरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अवैध धंदे असल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असा कुठलाही प्रकार नसल्याचे उत्तर दिले होते. पण रोहिणी खडसेंच्या आमदाराला चोप देण्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापलं होतं.

jalgaon eknath khadses daughter rohini khadse car attacked by unknown people
जळगाव: शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जुंपली, खडसेंकडून जीवाला धोका; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

'शिवसैनिकांनी काल रात्री महिलांचा विनयभंग करून धमकावले. आपण त्या ठिकाणी गेलो असता ते आमच्या अंगावरही धावून आले. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडलेला आहे. तर बोदवड येथे देखील माझ्या अंगावर शिवसेनेचे पदाधिकारी धावून आले होते. यामुळे मतदारसंघात दहशतीचे वातावरण असून महिला सुरक्षित नाही.' असा प्रत्यारोप रोहिणी खडसे यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in