ठाकरे सरकारला कुणी तालिबानी कसं म्हणू शकतं?; जावेद अख्तर यांचा सवाल

ठाकरे सरकारला कुणी तालिबानी कसं म्हणू शकतं?; जावेद अख्तर यांचा सवाल

ठाकरे सरकारची तालिबानी राजवटीसोबत तुलना : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या तीन पक्षांच्या आघाडीचं महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे"

पोलिसी कारवाईवर बोट ठेवत विरोधकांकडून ठाकरे सरकारची तुलना तालिबानसोबत करण्यात आली होती. विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेवरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 'कुणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबानी कसे व का म्हणू शकतं', असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबान बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस, विश्व हिंदू परिषदेवर टीका केली होती. उजव्या विचारांच्या संघटनांची त्यांनी तालिबानसोबत तुलना केली होती. जावेद अख्तर यांच्या या विधानावरून बरंच वादंग निर्माण झालं होतं. या सगळ्या वादावर अख्तर यांनी सामनामध्ये लेख लिहून भूमिका मांडली आहे.

या लेखात त्यांनी ठाकरे सरकारची तालिबानसोबत तुलना जात केल्या जात असल्याच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. 'एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, एकीकडे हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक माझ्यावर इतके चिडलेले असताना त्यांच्याच एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाराष्ट्र विकास आघाडी (मविआ) सरकारला 'तालिबानी' म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या तीन पक्षांच्या आघाडीचं महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे. त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही', जावेद अख्तर म्हणाले.

'आज महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता प. बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करीत असल्याचा आरोप करू शकत नाहीत. असे असताना कुणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबानी कसे व का म्हणू शकते हे मला तरी उमगलेले नाही', असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारची तुलना तालिबानसोबत कुणी केली होती?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना हे तालिबानी सरकार असल्याचं म्हटलं होतं. 'राजकीय बदल्याच्या भावनेतून राज्यातील पोलिसांचा वापर केला जात आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था असायला हवी. तालिबानसारखं शासन नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारची तालिबानसोबत तुलना केली होती. 'श्रावण महिना सुरू आहे, तरी देखील देव-धर्म मंदिरात बंदिस्त केले आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असतानाही राज्यातील ठाकरे सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. ही तालिबानी मानसिकता राज्यातील जनता सहन करणार नाही', असं ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in