लखीमपूर खीरी : शेतकऱ्यांना गाडीने उडवतानाचा 'तो' व्हिडीओ आला समोर

काँग्रेससह अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर : शेतकऱ्यांना पाठीमागून येऊन उडवले...
लखीमपूर खीरी : शेतकऱ्यांना गाडीने उडवतानाचा 'तो' व्हिडीओ आला समोर

लखीमपूर खीरी येथील घटनेनं अवघा देश हादरला. लखीमपूर खीरीत झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. घटना नेमकी कशी झाली याबद्दल प्रत्यदर्शीकडून सांगण्यात आलं. मात्र, आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओबद्दल पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबर रोजी भयंकर घटना घडली. यात 8 आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कुस्ती दंगल कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत असलेल्या उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात किसान मोर्चाचे शेतकरी निदर्शनं करत होते. यावेळी ही घटना घडली.

किसान सभेनं केलेल्या दाव्याप्रमाणे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचं सांगितलं जात आहे. तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि आशिष मिश्रा टेनी यांनी आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणी आशिष मिश्रा टेनीवर गुन्हाही दाखल झाला आहे.

या घटनेवरुन उत्तर प्रदेशातील राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसनं घटनेच्या दिवशीचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. 'लक्ष विचलित करून टाकणारी दृश्य. मोदी सरकारचं मौन याला गुंतागुंतीचं करत आहे', असं काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. या व्हिडीओबद्दल पोलीस वा प्रशासनानं कोणतंही भाष्य केलेलं नाही.

व्हिडीओमध्ये काय आहे?

लखीमपूर येथे शेतकरी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या जाण्याच्या मार्गावर निदर्शनं करताना दिसत आहे. शेतकऱ्यांची निदर्शनं सुरु असतानाच अचानक पाठीमागून एक गाडी येते. ही गाडी थेट शेतकऱ्यांना उडवत पुढे जाते. यात अनेक शेतकरी गाडीने उडवले जात असल्याचं दिसत आहे.

काँग्रेसबरोबरच आपचे खासदार संजय सिंह यांनीही हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यानंतरही तुम्हाला पुरावा हवाय का? बघा सत्तेच्या अंहकारात गुंड शेतकऱ्यांना कसे शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडत आहेत आणि काही चॅनेल्स ज्ञान पाजळत आहेत की मंत्र्याचा मुलगा जीव वाचवण्यासाठी पळाला', असं सिंह यांनी म्हटलं आहे.

या व्हिडीओबद्दल अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लोकही आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.