कोरोनानंतर चीनमध्ये लांग्या व्हायरसची दहशत; काही दिवसात तीन डझन रुग्णांना संक्रमण

जगात चीनमधूनच कोरोना वायरस पसरला होता. त्यानंतर आता लांग्या व्हायरसचं संकट चीनमध्ये घोंगावत आहे.
Langya virus the latest infection emerging from China
Langya virus the latest infection emerging from China

चीनमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनानंतर आता चीनमध्ये लांग्या व्हायरस धुमाकूळ घालत आहे. जगात चीनमधूनच कोरोना वायरस पसरला होता. त्यानंतर आता लांग्या व्हायरसचं संकट चीनमध्ये घोंगावत आहे. आतापर्यंत 35 जण या विषाणूने चीनमध्ये संक्रमित झाल्याची माहिती समोर येत आहे. या व्हायरसचं नाव हेनिपा व्हायरस किंवा लांग्या व्हायरस असं आहे.

लांग्या व्हायरस नेमका कसा पसरतो, संसर्ग कसा वाढतो?

कोरोना व्हायरस जसा वटवाघुळापासून पसरला असं सांगितलं जातं, तशाच पद्धतीने जनावरापासून लांग्या पसरला आहे, अशी माहिती समोर येत आहे. शेंडोन्ग आणि हेनोन या प्रांतात आत्तापर्यंत 35 जण बाधित झाले आहेत, अशी माहिती चीनच्या मीडियाकडून मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते हा विषाणू गंभीर आहे. संक्रमित व्यक्तीची प्रकृती जर गंभीर झाली तर मृत्यू देखील होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, अजूनतरी एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

लांग्या व्हायरसची लागण झाल्याची काय आहेत लक्षणे?

आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये खोकला, ताप, मळमळ होणे आणि थकवा हे लक्षणे दिसून आले आहेत. त्यातून कोणी गंभीर झालं नसल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले. घशातील स्वाबच्या माध्यमाने रुग्णाला या विषाणूचे संक्रमण झाले आहे की नाही, हे पाहता येते. या व्हायरसवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते जनावरांपासून याचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत यावर कोणत्याहीपद्धतीची लस आलेली नाही. सध्या नॉर्मल फ्लूवर करतात तो उपचार या रुग्णांवर केला जात आहे.

निपाह व्हायरसच्या कुटुंबापासून लांग्या वायरसची उत्पत्ती

याबाबत अधिक माहिती देताना तज्ज्ञांनी सांगितलं की निपाह व्हायरसच्या माध्यमाने हे व्हायरस येतात. निपाह व्हायरस हा घातक असा व्हायरस आहे. साधारणतः निपाहचे विषाणू वटवाघुळात आढळतात. कोव्हीडप्रमाणे हा व्हायरस देखील श्वसनातून पसरतो. WHO ने निपाहला पुढील येणाऱ्या महामारीच्या यादीत समावेश केलं आहे. निपाहवर उपचारासाठीची कोणतीही लस आत्तापर्यंत बनलेली नाही.

जगात सध्या विविध रोगांचा थैमान पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्ष सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता. अजून देखील अनेक देशात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मंकीपॉक्स या रोगाने देखील तोंड वर काढले आहे. काही देशात मन्कीपॉक्सचे संक्रमण वाढत आहे. अशात आता चीनमधून लांग्या व्हायरसने तोंड वर काढले आहे. त्यामुळे या व्हायरसची धास्ती घेतली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in