महाराष्ट्रातील एक गाव जिथे हनुमानाची पूजा करणं दूर, 'मारूती'ची गाडीही घेतली जात नाही

राज्यात मशिदींवरील भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा वाजवण्याचा मुद्दा समोर आला आहे...
महाराष्ट्रातील एक गाव जिथे हनुमानाची पूजा करणं दूर, 'मारूती'ची गाडीही घेतली जात नाही

-रोहित वाळके, अहमदनगर

गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर राज्यात हनुमान चालीसा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून मशिदींबाहेर हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्यावरून चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं आहे, पण महाराष्ट्रात एक गाव आहे, जिथे हनुमानाची पुजा केली जात नाही. इतकंच काय तर या गावात मुलांची नावंही हनुमान किंवा मारूती अशी ठेवली जात नाही.

महाराष्ट्रातील हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात. गावाचं नाव दैत्यनांदुर. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७० किमी अंतरावर असलेल्या दैत्यनांदूरमध्ये हनुमानाची पूजा का केली जात नसेल? असा प्रश्न पडला. त्याचा शोध घेताना 'मुंबई Tak'च्या टीमला गावाबद्दलची एक कहाणी ऐकायला मिळाली.

दैत्यनांदुरमध्ये आजही हनुमानाची पुजा केली जात नाही, ना व्यक्तीचं नाव हनुमान, मारूती असं ठेवलं जात नाही. आणखी एक बाब म्हणजे हनुमानाला मारुती असंही म्हटलं जातं. त्यामुळे या गावातील लोक मारूती कंपनीची गाडी देखील घेत नाही.

दैत्यांची पूजा करणारे चंद्रकांत जोशी यांनी गावात हनुमानाची पूजा न करण्यामागील कारण सांगतांना प्राचीन कथा सांगितली, ती अशी, "सत युगात सीता अयोध्या सोडून लव-कुश यांच्यासोबत दंडकारण्यात आली. सीतेबरोबर हुनमानही दंडकारण्यात आला. येथे निंबा दैत्य व हनुमानाची लढाई झाली."

"यावेळी निंबा दैत्याच्या तोंडून प्रभु श्रीरामाचं नाव घेतलं गेलं. कालांतराने प्रभु श्रीराम देखील येथे आले. हनुमानाप्रमाणेच निंबा दैत्यही आपला भक्त आहे, हे पाहुन प्रभु श्रीरामाने दैत्य कुळात जन्मलेल्या, पण आपली भक्ती करणाऱ्या निंबा दैत्याला असं वरदान दिलं की आजपासून दंडकारण्यात हनुमानाची पूजा न करता दैत्य निंबाची पूजा केली जाईल. त्यामुळेच गावाला दैत्यनांदुर असं नाव पडलं आहे," असं पुजारी जोशी यांनी सांगितलं.

गावात हनुमानाची पुजा केली जात नाही. होणाऱ्या अपत्याचं नावही ठेवलं जात नाही. गावात मारूती कंपनीची गाडी देखील खरेदी केली जात नाही. कारण गावकऱ्यांची अशी भावना आहे की, जर कुणी हनुमानाचं नाव ठेवलं किंवा मारूती कंपनीची गाडी घेतली, तर त्यांच्यावर काहींना काही संकट येतं.

हनुमानाची पूजा न करण्याच्या परंपरेबद्दल गावातील ओंकार दहिफळे या तरुणाने सांगितलं, 'विज्ञान युग असलं, तरी आमची यावर श्रद्धा आहे. आम्ही गावाची परंपरा आजदेखील पाळतो म्हणून गावात हनुमानाचं नाव घेत नाही. गावाच्या बाहेर जर लग्न असेल, तर आम्ही नवरदेवाला हनुमान मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊ देतो. कारण परंपरा व श्रद्धा वेगवेगळ्या आहेत.

Related Stories

No stories found.