तीन मुलांचा बाप,घरात एकटाच कमावता,दिल्लीच्या स्फोटात जीव गेला, वृद्ध आईला बातमी सांगण्याची कोणाची हिंमत होईना
Delhi Car Blast : तीन मुलं, घरात एकटाच कमावता, दिल्लीच्या स्फोटात जीव गमावला, वृद्ध आईला बातमी सांगण्याची कोणाची हिंमत होईना
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन मुलं, घरात एकटाच कमावता, दिल्लीच्या स्फोटात जीव गमावला
वृद्ध आईला बातमी सांगण्याची कोणाची हिंमत होईना
Delhi Car Blast : दिल्लीत मंगळवारी (दि.11) झालेल्या कार ब्लास्टमुळे संपूर्ण देश हादरलाय. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवाद्यांनी रचलेला कट असून या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास सुरु केलाय. दरम्यान, या भीषण घटनेत उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी अशोक कुमार (वय 34) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. दिल्लीमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करणारे अशोक दररोजप्रमाणे ड्युटी संपवून घरी परतत होते. पण त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या स्फोटाने सर्व काही संपवलं.
वृद्ध आईला मुलाची बातमी सांगण्याची कोणाची हिंमत होईना
अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मंगरौला गावात अशोक यांचं घर आहे. वडिलांचं निधन आधीच झालेलं असून आता वृद्ध आई आणि संपूर्ण कुटुंबाचा एकमेव आधार अशोकच होते. त्यांच्या जाण्याने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. परंतु आईला अद्याप मुलाच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आलेली नाही. कुटुंबियांचा सांगण्याप्रमाणे, आईची तब्येत नाजूक असल्याने काही काळ सत्य दडवून ठेवण्यात आलं आहे.
अशोक यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. ते दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि संपूर्ण घरखर्च त्यांच्या नोकरीवरच अवलंबून होता. त्यांचे नातेवाईक म्हणाले, “ते आमचे मेहुणे होते. फार मेहनती माणूस होता. रोज ड्युटी संपवून कुटुंबासाठी काही ना काही घेऊन घरी यायचा. असा अंत होईल, याची कल्पनाही नव्हती.”
हेही वाचा : वडील हयात नाहीत, आईला कॅन्सर; धंद्यासाठी कपड्यांची खरेदी करायला गेला अन् दिल्ली ब्लास्टमध्ये...










