
महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील जिंकला. पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरचा पराभव केला आणि त्याला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. मानाची गदा जेव्हा त्याला मिळाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा ठरला. आता याच पृथ्वीराज पाटीलचा एक फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.
जे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पृथ्वीराज पाटील याने प्रयत्नांची शर्थ केली होती. ते स्वप्न साकार झाल्यानंतर निवांत झोप घेण्यासाठी पृथ्वीराज पाटील पलंगावर पडला. त्याने मानाची गदा मात्र सोडली नाही. मानाची गदा कुशीत घेऊन पृथ्वीराज पाटील निवांत झोपला. त्याचा हाच फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. तसंच पृथ्वीराज पाटीलवर कौतुकाचा वर्षावही होतो आहे.
महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात मानाचं स्थान असलेली ६४ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा शनिवारी साताऱ्यात पार पडली. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने २२ वर्षांचा जिल्ह्याचा दुष्काळ संपवत मुंबईच्या विशाल बनकरवर मात करत मानाची गदा पटकावली. परंतू या विजेतेपदानंतरही पृथ्वीराज पाटीलच्या मनात एक खंत कायम आहे. शनिवारी स्पर्धा जिंकल्यानंतर साताऱ्यात पृथ्वीराजची जल्लोषात मिरवणूक निघाली, कोडकौतुक झालं. मानाची गदा आणि चषकही मिळाला.
माझं विजेतेपद आणि मानाची गदा मी कोल्हापुरकरांना अर्पण करत आहे असं म्हणत पृथ्वीराजने सर्व कोल्हापूरवासियांची मनं जिंकली. अंतिम सामन्याला पृथ्वीराजच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती. आपल्या मुलाला मिळालेलं यश पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.
कोल्हापूरला २२ वर्षांपासून महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली नव्हती. माझ्या मुलाने हा २२ वर्षाचा दुष्काळ महाराष्ट्र केसरी विजेतेपद घेऊन दूर केला याचा मला अभिमान आहे. आई म्हणून मला खूप आनंद आहे, पृथ्वीराज जिद्द , चिकाटी व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली हा विजय कोल्हापूरकरांना अर्पण केला याचा मला सार्थ अभिमान मला आहे, असं म्हणत पृथ्वीराजच्या आईने माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली.