महाराष्ट्रातील ‘गांधीजींचं गाव’ : काय आहे गांधीजींच्या गावाची संकल्पना?

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या विचारांची स्मृती जपणार 'कोंभळी'
महाराष्ट्रातील ‘गांधीजींचं गाव’ : काय आहे गांधीजींच्या गावाची संकल्पना?
जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेलं हे गाव आहे.

-रोहित वाळके

देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्याची विचारधारा जोपासणारी अनेक माहिती नसलेल्या गोष्टी दृष्टीआड होत आहेत. स्वातंत्र्य संग्रामाच्या अगोदरपासूनच गांधीजींच्या विचारांचे वारे या गावात वाहत होते म्हणूनच आजही या गावाला ‘गांधीजींचे गाव’ म्हटले जातं. या गावाचं नाव आहे कोंभळी!

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर घोगरगाव आहे. इथून अर्धा किमी अंतरावर कोंभळी फाटा आहे. उजव्या बाजूला दिसणाऱ्या या फाट्यापासून दहा किमी अंतरावर पुढं गेल्यावर कोंभळी गाव सुरु होतं. रस्ता तसा चांगला झालेला त्यामुळे नगरपासून साधारणतः तासाभरात इथे पोहचता येतं.

काय आहे गांधीजींच्या गावाची संकल्पना?

जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेलं हे गाव. शेती हा येथील मूळ व्यवसाय. पारंपरिक पद्धतीने शेती करत शिक्षण करणं आणि त्यातून आपला उत्कर्ष साधणं हे येथील गावकऱ्यांचे ध्येय. दुष्काळी प्रदेशातील असल्यानं पाऊस कमीच. त्यामुळे शेतीवर अवलंबून न राहता येथील नागरिकांनी शिक्षणाला जवळ केलं.

शिक्षणाची गंगा या गावात आली ती गांधीजींच्या विचाराने.1942 मध्ये एक शिक्षकी असलेली शाळा स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत पाच ते सहा शिक्षकांपर्यंत पोहोचली. त्यावरून गावात शिक्षणाला किती महत्व असावे याचा अंदाज येतो. गाव तसे साधारणच, पण वेगळ्या वैशिष्ट्यामुळे अचानक प्रकाशझोतात आले.

इतर गावांप्रमाणे इथेही सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी देवादिकांचे मंदिरे आहेत. परंतु आगळंवेगळं मंदिर इथे पहावयास मिळते ते म्हणजे महात्मा गांधीजींचं. येथील गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे गावाला गांधीजींचे गाव म्हणून नाव पडले. गावातील जिल्हा परिषद शाळेत गांधीजीच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न होतोय. त्यासाठी खास सर्वोदय मंदिरही बांधण्यात आलं आहे. या मंदिरात गांधीजींचा ६ फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा गेल्या ६६ वर्षापासून उभा आहे. त्यामुळे गांधीजींचं मंदिर असलेलं हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. शाळेचं कार्यालयही याच मंदिरात आहे.

शाळेची घंटा वाजली कि, सर्व मुले या मंदिराच्या समोर जमतात. दैनदिन प्रार्थना म्हणताना गांधीजींचं भजन गायलं जातं. शाळेची दैनंदिन सुरुवात गांधीजींच्या दर्शनानं होते.

याबाबत सांगताना येथील जुन्या पिढीतील शिक्षक नाना गांगर्डे गुरुजी म्हणतात, “गावातील या शाळेत आम्ही शिकत असताना संपूर्ण शाळा सूत कातत असे. 1942-43 मध्ये गावात प्राथमिक शाळा सुरु झाली. त्यावेळी मुलोद्यागी शिक्षणाला प्राधान्य असल्याने शिक्षकांनी सुत काताण्याच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले होते. आम्ही सर्व सूत कातायचो. परिसरात ही शाळा सर्वाधिक सूत तयार करणारी शाळा म्हणून नावलौकिक होता.'

'इथे चरखे होते. हातमाग होते आणि टकळीही होती. मुलोद्योगी शाळा म्हणून जिल्हाभरात नावाजलेली होती. हे सर्व कातलेले सूत वर्ध्याला पाठवलं जाई. त्यापूर्वी कोपरगाव येथे स्पर्धा असे. ज्यांचं सूत चांगलं त्या शाळेला बक्षीस मिळत असे. तसे अनेक बक्षीस शाळेला मिळाले आहेत. प्रमाणपत्रेही शाळेत उपलब्ध आहेत', गांगर्डे गुरूजींनी सांगितलं.

सुतयज्ञ

शाळेत सुत यज्ञ असे. म्हणजेच २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी या सूत यज्ञाला सुरवात होत असे. ते थेट 10 ऑक्टोबरपर्यंत तो चाले. या कालावधीत मुले रात्रंदिवस सूत कातण्याचं काम करत असे. गांगर्डे म्हणाले , “या आठ दिवसात तयार झालेले सूत ३० जानेवारी ते 12 फेब्रुवारी या काळात होणाऱ्या प्रदर्शनात मांडले जाई. ३० जानेवारी हा गांधीजींचा स्मृती दिन ते 12 जानेवारीपर्यंत स्मृतीदिन साजरा केला जात असे. या काळात परिसरातील सूत काताणाऱ्या शाळांना कोंभळी गावात बोलावले जाई. शेजारील मिरजगाव, कर्जत, खांडवी येथील शाळा येत असत. सर्व शाळांनी केलेल्या सूत गुंड्या गांधीजींना अर्पण केल्या जात.'

'गावात प्रभात फेरी काढली जात असे. सर्व मुले गावकरी यामध्ये सहभागी होत.या काळात मुले श्रमदान करण्यासाठी जवळच्या तलावावर जायचे. शेवटच्या दिवशी 12 फेब्रुवारीला गांधीवादी विचारवंत आणि माजी मंत्री बाळासाहेब भारदे यांचं प्रवचन असे. त्यांनी सलग 10 वर्षे या गावात येऊन प्रवचन केलं. 1952 साली दुष्काळ पडला होता. शाळेतील मुलं जवळच्या तलावावर जाऊन इतरांबरोबर श्रमदान करत होती. त्याकाळी असलेल्या ग्राम शिक्षण अधिकारी यांनी या मुलांचे मोल फुकट न घेता त्यांना ५०० रुपये दिले. ते ५०० रुपये आणि मुलांनी हाताने भारताचा नकाशा असलेली सतरंजी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जवळच्या गुरवपिंपरी येथे दुष्काळाची पाहणी करायला आल्यानंतर त्यांना भेट दिली. त्यानंतर शिक्षण मंत्री हितेंद्र देसाई यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे कौतुक केले होते”, अशी आठवण त्यांनी सांगितली.

त्याकाळी गाव गांधीजींच्या विचाराने भारावलेले होते.खादी हा विचार गावात रुजला होता. खादी हीच प्रेरणा घेऊन शाळा आणि गाव पुढे जात होते. हीच प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी मुलांच्या हातात चरखा देण्यात येत होते. मुलेही आनंदाने स्वीकारत करत असत. त्यातूनच गांधीजींच्या मंदिराची संकल्पना पुढे आली.

तत्कालीन शिक्षक लोखंडे यांनी सूत स्पर्धेला गेल्यानंतर कोपरगाव येथे त्या प्रदर्शनात गांधीजींचा पुतळा पहिला आणि तसा पुतळा बसविण्यासाठी राजस्थानमधून कारागीर बोलावले. या कारागिरांनी सहा महिने काम करून गांधीजींचा पुतळा तयार केला. हा पुतळा संपूर्ण संगमरवरी आहे. त्यानंतर या पुतळ्यासाठी गावातील गांधीवादी कार्यकर्ते चंदनमल भळगट यांनी सर्वोदय मंदिर बांधले ते वर्ष होते 1954-55.

गावातील शाळा साडेचार एकर क्षेत्रावर आहे. त्यापैकीच काही भागावर हातमागाच्या कार्यशाळा होत्या. त्यामध्ये हातमाग, चरखे होते. मुलोद्योगी तासाला सर्व विद्यार्थी तिथे जाऊन सूत कातण्याचं काम, चरखा चालवणे, हातमाग शिकणे यासारख्या गोष्टी शिकत. मात्र काळाच्या ओघात या सर्व वस्तू आणि वास्तू नामशेष झाल्या.

आजही या गावातील नागरिक गांधी जयंती, ३० जानेवारी गांधीजींचा स्मृतिदिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी शाळेत मोठ्या संखेने जमतात. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेतात. त्यामुळे नवीन पिढीला या गांधीजींच्या विचारांची ओळख होते.

स्वातंत्र्य संग्रामात या गावाचा तसा थेट संबंध नव्हता कि, येथील कोणी संग्रामात भाग घेतला,मात्र गांधीजींची विचारधारा या गावात रुजली.येथील सर्वोदय मंदिर गावकऱ्यांसाठी राजघाटच आहे.15 ऑगस्ट 1947 ला संपूर्ण गाव जागे होते. गावातील लहानथोर रात्री पासून ढोलताशाच्या गजरात नाचत होते, गुलाल उधळून स्वातंत्र्याचा जयघोष करत होती. तो दिवस अजूनही आपण विसरू शकत नसल्याचे नाना गुरुजी सांगतात.

गांधीजींचा आदर त्यांची पूजा करणे आणि प्रार्थना करणे हेच येथील विद्यार्थ्यांचे काम असे. दररोज प्रार्थना होत असे आजही इथे गांधीजींच्या प्रार्थना विद्यार्थी दररोज म्हणतात. गावचे सरपंच कुंडलिक गांगर्डे म्हणाले, 'दरवर्षी गावात गांधी जयंतीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण यासारखे उपक्रम हाती घेतले जातात. पण आता मंदिर बंद आहे.'

गावात गांधीवादाची परंपरा असल्याने सर्व गावकरी समन्वयाने आपल्या अडचणी सोडवतात. याबाबत अधिक माहिती सांगताना निवृत्त शिक्षक सोपान गांगर्डे यांनी सांगितलं, “गावात गांधीजींच्या विचारांचा आदर केला जातो. इथे वाद होतात, मात्र सामोपचारानं मिटवले जातात. गावाच्या एकीला तडा जाणार नाही अशी वागणूक ठेवण्यावर गावकऱ्यांचा भर असतो. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं जातं .गावात शिक्षणाचे प्रमाण चांगले असल्याने प्रत्येक घरातील कोणी न कोणी नोकरीस आहेत. ही गांधीजींच्या विचारांची देणगी म्हणावे लागेल.”

या गावांचा आदर्श आता इतर गावातील नागरिक घेत आहेत. देश गांधीजींच्या १५१ व्या जयंती साजरी करत आहे.त्या निमित्ताने गावकऱ्यांनी गांधीजींच्या विचारांचे दृढीकरण करण्याचे ठरवले आहे.

Related Stories

No stories found.