हिजाबवरून सुरू असलेल्या वादात मलालाची उडी, भारतीय नेत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

जाणून घ्या काय म्हटलं आहे मलाला युसुफजाईने?
हिजाबवरून सुरू असलेल्या वादात मलालाची उडी, भारतीय नेत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाबच्या वादात आता मलाला युसुफजाईने उडी घेतली आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफजाईने या प्रकरणी कर्नाटकातल्या हिजाबप्रकरणी भारतीय नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कर्नाटकात हिजाब प्रकरण मंगळवारी जास्त चिघळलं. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधात निदर्शनं तीव्र झाली. त्याचे पडसाद आता अनेक ठिकाणी उमटत आहेत. यामुळे कर्नाटकातल्या शाळा, शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

काय म्हटलं आहे मलालाने?

'कॉलेज मुलींना अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे.' या आशयाचं ट्विट मलालाने केलं आहे.

हिजाबच्या वादामुळे कर्नाटकात सुरू झालेले आंदोलन मंगळवारी राज्यभर पसरले. कॉलेज कॅम्पसमध्ये दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सरकार आणि उच्च न्यायालयाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी त्यांच्या एका याचिकेवर न्यायालय विचार करत आहे. या प्रकरणाचे मोठ्या वादात रुपांतर झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

काय आहे हा संपूर्ण वाद?

जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात 6 विद्यार्थिनी महाविद्यालय प्रशासनाच्या नियमांविरुद्ध हिजाब घालून महाविद्यालयात आल्या होत्या. यानंतर कर्नाटकातील इतर महाविद्यालयांमध्येही हिजाब घालण्यावरून वाद निर्माण झाला होता.

हिजाबच्या निषेधार्थ काही विद्यार्थी भगवी शाल घेऊन शाळा-कॉलेजमध्ये येऊ लागले. त्यामुळे प्रकरण अधिकच तापले. मंगळवारी हिजाबच्या वादावरून कर्नाटकातील शिवमोग्गा आणि बागलकोट जिल्ह्यात दगडफेक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांचे समर्थक आणि भगवी शाल परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

हिजाबचा वाद पाहता राज्य सरकारने कर्नाटकातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालता येईल का, याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता वाढता वाद पाहता कर्नाटक सरकारने सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in