धक्कादायक! पोटच्या मुलाला 22 कुत्र्यांसोबत खोलीत डांबलं, निर्दयी आई-बापाविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्याच्या कोंढवा परिसरातील घटना, दोन वर्षांपासून मुलगा राहत होता कुत्र्यांसोबत
धक्कादायक! पोटच्या मुलाला 22 कुत्र्यांसोबत खोलीत डांबलं, निर्दयी आई-बापाविरुद्ध गुन्हा दाखल
या खोलीतली बहुतांश कुत्री ही भटकी होती तर खोलीची अवस्था अतिशय खराब झाली होती

पुण्यातील कोंढवा भागात एका आई-वडिलांची निर्दयता समोर आली आहे. आपल्या 11 वर्षांच्या मुलाला दोन वर्ष एका खोलीत 22 कुत्र्यांसोबत डांबून ठेवणाऱ्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन 2000 चे कलम 23,28 प्रमाणे कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संजय लोधरिया आणि शितल लोधरिया अशी या आरोपी माता-पित्याची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील कृष्णाई इमारतीमध्ये संजय लोधरिया आणि शितल लोधरिया राहतात. ते राहत असलेल्या घरात 20 ते 22 कुत्रेदेखील राहतात. धक्कादायक बाब म्हणणे संजय आणि शितल यांनी आपल्या 11 वर्षांच्या मुलाला या 22 कुत्र्यांसोबत दोन वर्ष खोलीत डांबलं होतं. हा मुलगा खिडकीत बसून कुत्र्यासारखं वर्तन करायचा.

चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अपर्णा मोडक यांना एका व्यक्तीने फोन करुन याबद्दल माहिती दिली. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना 11 वर्षाचा मुलगा एका बेडवर झोपलेला सापडला व त्याच्या आजुबाजूला 20-22 कुत्री दिसून आली.

ही सर्व भटकी कुत्री होती. तसेच त्यांनी खोलीत बरीच घाण करुन ठेवली होती. चाईल्ड लाईन संस्थेच्या अपर्णा मोडक यांनी मुलाच्या आई-वडिलांना मुलाच्या तब्येतीविषयी विचारणा केली. यानंतर पुन्हा एकदा जाऊन चौकशी केली असता त्यांना हाच प्रकार दिसून आला. ज्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आई-वडिलांनी मुलाला कुत्र्यांसोबत डांबून का ठेवलं, ही कुत्री त्यांना कोणी दिली होती का?, त्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च कसा होत होता? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर पोलीस तपासातून समोर येणं अपेक्षित आहे. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक करुन 11 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in