मुंबई जिल्हा बँकेवरचं प्रविण दरेकरांचं वर्चस्व संपुष्टात; सिद्धार्थ कांबळे विजयी, प्रसाद लाड पराभूत

मुंबई जिल्हा बँकेवरचं प्रविण दरेकरांचं वर्चस्व संपुष्टात; सिद्धार्थ कांबळे विजयी, प्रसाद लाड पराभूत
bank election

मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर प्रविण दरेकरांचं वर्चस्व होतं. मात्र राष्ट्रवादीने भाजपच्या तोंडचा घास हिरावून घेत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत तर भाजपचे प्रसाद लाड पराभूत झाले आहेत. सिद्धार्थ कांबळेंना 11 तर प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली आहे.

मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचलकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्यूहरचना करत भाजपच्या प्रविण दरेकर यांच्या हातून सत्ता खेचून घ्यायची त्यांचं वर्चस्व संपवायचं असं नियोजन करण्यात आलं. ते नियोजन यशस्वी करत राष्ट्रवादीने हा भाजपला झटका दिला आहे.

सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई बँकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.

अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या गळ्यात पडलं आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचं ठरलं. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली.

काय म्हणाले प्रविण दरेकर?

भाजपकडे 10 मतं होती, विष्णू भुंबरे हे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला 11 मतं मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in