पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील राजीवली गावातील वाघराळपाडा येथे बुधवारी (१३ जुलै) अतिवृष्टी झाल्यानं दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून एक घर दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.
अमित ठाकूर (वय ३५), रोशनी ठाकूर (वय १४) अशी मृतांची नावं आहेत. तर वंदना अमित ठाकूर (वय ३३), ओम अमित ठाकूर (वय १०) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. मयत व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या वारसांना शासन नियमाप्रमाणे नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली.
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे.'
'कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील, असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, दोन लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. यात घटनेत अनेक घरांचं नुकसान झालं आहे.
#WATCH महाराषà¥à¤à¥à¤°: पालà¤à¤° à¤à¤¿à¤²à¥ à¤à¥ वसठà¤à¤²à¤¾à¤à¥ मà¥à¤ à¤à¥à¤¸à¥à¤à¤²à¤¨ à¤à¥ à¤à¤à¤¨à¤¾ सामनॠà¤à¤à¥¤ हादसॠमà¥à¤ à¤à¤ लà¥à¤à¥à¤ à¤à¥ फà¤à¤¸à¥ हà¥à¤¨à¥ à¤à¥ à¤à¤¶à¤à¤à¤¾ हà¥, दॠलà¥à¤à¥à¤ à¤à¥ बà¤à¤¾à¤¯à¤¾ à¤à¤¯à¤¾à¥¤ à¤à¤ à¤à¤° à¤à¥à¤·à¤¤à¤¿à¤à¥à¤°à¤¸à¥à¤¤ हà¥à¤ हà¥à¤à¥¤ pic.twitter.com/Lb8ApUT5Pg
— ANI_HindiNews (@AHindinews) July 13, 2022
मंगळवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात रिप रिप पडत असलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने अनेक सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाले. तर दुसरीकडे कल्याणमध्ये दुर्गाडी खाडीचे पाणी देखील वाढले असून, गणेश घाटाच्या रॅलिंगला पाणी लागलं आहे. कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत. तसेच प्रशासनाकडून या परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
गोदिंया जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अखंड पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्या-नाले भरून वाहू लागले आहेत. गोदिंया ते तिरोडा यांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र पावसाच्या तडाख्याने हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे वाहतुकही बंद झाली आहे.
पावसाची संततधार सुरूच असल्याने गोदिंया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आणि गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. तिरोडा मार्ग आणि आमगाव मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. गोदिंयातील गौशाळा वार्ड, भीम नगर, सुंदर नगर, कस्तुरबा वार्ड, गौतम नगर, गोविंदपूर आदी भागांमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.
मुंबईत मुसळधार पाऊस, रस्ते जलमय
मुंबईत बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात जोरात पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यानं मुंबईतील काही भागात रस्ते जलमय झाले. काही मार्गांवरील बेस्ट बसेसचे मार्गही बदलण्यात आले आहेत.
Maharashtra | Mumbai continues to reel under severe water-logging due to heavy rainfall. Visuals from Dadar East pic.twitter.com/6aLg28QLG3
— ANI (@ANI) July 13, 2022
वर्ध्यात बंधारा फुटला, अनेक घरांमध्ये पाणी
वर्धा तालुक्यातील पवनूर गावाजवळील वन विभागाचा वनराई बंधारा फुटल्यामुळे आंजी ते पवनुर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पवनूर येथील ३० ते ३५ घरांमध्ये, तर खानापूर येथील ५ ते ६ घरं व कामठी येथील ८ घरांमध्ये पाणी शिरले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसिलदारांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सहस्त्रकुंड धबधबा खळाळला
जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानं विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेलगत पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा लागला वाहू लागला. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भातील पर्यटकांबरोबरच आंध्र प्रदेश, तेलंगणातील लोकही धबधबा बघण्यासाठी येत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 6 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने सोळाही तालुक्यात कहर केला असून, सर्व भाग जलमय झाला आहेत. 10 मंडळात अतिवृष्टी झाली असून, नदी नाल्यांना पूर आल्यानं उमरखेड-पुसद मार्गावरील वाहतूक बंद आहे.
उमरखेड-धानकी मार्गही बंद करण्यात आला असून, अरूनवाती नदीला आलेल्या पुरामुळे आर्णी शहरात पाणी शिरलं आहे. ५० पेक्षा जास्त घरात पाणी शिरल्यानं जनजीवन कोलमडून गेलं आहे. वणी विभागातील निरगुडा आणि ग्रामीण भागातील ओढ्या-नाल्यांना पूर आल्यामुळे नंदेपेरा गावातील काही घरात पाणी शिरले आहे.
आबाई फाटा ते कुरई ते शिंडोला, मुर्धोनी ते पलासोनी, पेतुर, वागदरा या मार्गावरील वाहतुकही बंद झाली आहे. पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका महागाव तालुक्यातील काही गावांना बसला आहे. महागाव शहरातही पाणी भरलं आहे.
पुसद, महागाव, उमरखेड, राळेगाव, कळंब, वणी, पांढरकवडा, झरिजमनी, मारेगाव या भागातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं तलावाचे स्वरूप आलं आहे. कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
नागपूर जिल्ह्यात धरणातून पाण्याचा विसर्ग
नागपूर जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू असून, नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी,रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असं आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केलं आहे.