
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. डेल्टापेक्षा अधिक वेगानं संसर्ग होत असलेल्या ओमिक्रॉनची अनेक लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. त्यात आता आणखी एका त्रासदायक लक्षणाची भर पडली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर कानावरही परिणाम होत असून, संसर्गानंतर कानातही त्रास होत आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर २० पेक्षा अधिक लक्षणं आढळून येत आहे. त्यामुळे फ्लू आणि ओमिक्रॉन हे ओळखणं जिकिरीचं झालं आहे. संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीला वेगवेगळ्या स्वरूपाचा त्रास होत असून, कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतलेल्यांमध्ये आणखी एक लक्षणं आढळून आलं आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंट शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर हल्ला करत आहे. ह्रदय, मेंदू आणि डोळ्यांबरोबरच आता हा विषाणू कानावरही हल्ला करु लागला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर कानातही त्रास होत असल्याचं आढळून आलं आहे. कानात झणझण होणं, शिटी वाजल्यासारखा आवाज येणं अशा स्वरूपाची लक्षणं काही रुग्णांमध्ये् आढळून आली आहेत.
कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतलेल्यांमध्ये हे लक्षणं आढळून येत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना थंडी जाणवत आहे. वेळीच उपचार केल्यास हा त्रास लवकर बरा होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या कानातील आतील रचनेचा अभ्यास केला. ज्यात ओमिक्रॉन व्हेरियंट कर्ण यंत्रणेवरही परिणाम करत असून, कानात त्रास होणं, झणझण आणि आवाज येण्यासारखी लक्षणं दिसत आहे.
डॉ. कॉन्स्टेंटिना स्टॅकोवीक म्हणाले, 'जर नागरिकांना ऐकण्यात त्रास जाणवत असेल किंवा कानात आवाज घुमण्याबरोबरच चक्कर येण्यासारखा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने कोरोना चाचणी करावी. नवीन कोरोना रुग्णांमध्ये आवाज न येण्याचा त्रास होत असल्याचं लक्षणं दिसून आलं आहे', असं डॉ. स्टॅकोवीक यांनी सांगितलं.