पंतप्रधान इम्रान खान यांना मानसिक आजार, त्यांना लवकर अटक करा -मरियम शरीफ
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिले आहे. दुसरी विरोधकांचे शाब्दिक हल्ले सुरूच असून, मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांचा नामोल्लेख टाळत ते मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं विधान केलं आहे. त्याचबरोबर काही नुकसान करण्यापूर्वी त्यांना अटक करण्याची मागणीही शरीफ यांनी केली आहे. मरियम नवाज शरीफ […]
ADVERTISEMENT

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिले आहे. दुसरी विरोधकांचे शाब्दिक हल्ले सुरूच असून, मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांचा नामोल्लेख टाळत ते मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं विधान केलं आहे. त्याचबरोबर काही नुकसान करण्यापूर्वी त्यांना अटक करण्याची मागणीही शरीफ यांनी केली आहे.
मरियम नवाज शरीफ म्हणाल्या, “यावेळी मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीच्या हाती यावेळी आगपेटी आहे. आगपेटीच्या मदतीने ती व्यक्ती सर्वत्र आग लावू इच्छिते. त्यांच्याकडून काहीतरी नुकसान घडवून आणलं जाण्यापूर्वीच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जावी. अशा व्यक्तीच्या हाती २२ कोटी जनतेचं भवितव्य सोपवलं जाऊ शकत नाही,” असं त्या म्हणाल्या.
“देशाला वाचवायचं असेल, तर नॅशनल असेंब्लीचे सभापती, उपसभापती आणि इम्रान खान यांना देशाशी दुश्मनी व संविधानाचं नुकसान केल्याप्रकरणी अटक करायला हवी. हीच संपूर्ण देशाची मागणी असायला हवी. देशासाठी आवाज उठवा. आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने स्वतःहून दखल घेतली पाहिजे आणि इम्रान खान, सभापती आणि उपसभापती यांना अटक करण्याचे आदेश दिले पाहिजेत,” अशी मागणी मरियम नवाज शरीफ यांनी केली आहे.
इम्रान खान यांनी ठेवल्या तीन पूर्व अटी
दरम्यान, विरोधकांकडून पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं जात आहे. याच दरम्यान इम्रान खान यांनी राजीनामा देण्यास तयारी असल्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील जिओ न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी पदाचा राजीनामा देण्यासाठी तीन अटी ठेवल्याचं वृत्तात म्हटलेलं आहे. ज्यात पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर अटक केली जाऊ नये. त्याचबरोबर त्यांच्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला पंतप्रधान करण्यात यावं आणि तिसरी अट म्हणजे एनएबी अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल करण्यात येऊ नये.
दोन मंत्र्यांनी बदललं ट्विटर बायो
पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी ट्विटरवरील बायोमध्ये बदल केला आहे. दोन्ही मंत्र्यांनी पाकिस्तानचे माजी मंत्री असा उल्लेख केला आहे. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती मंत्री असलेल्या फवाद चौधरी यांनी माजी मंत्री असा उल्लेख केला आहे.
त्याचबरोबर शाह महमूद कुरेशी यांनीही बायोमध्ये बदल केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री असलेल्या कुरेशी यांनी बायोमध्ये माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री असा बदल केला आहे.
“इम्रान खानला दगा देऊ शकत नाही”
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी असेंब्लीचे सभापती असद कैसर यांनी मतदान घेण्यास नकार दिला आहे. “अविश्वास प्रस्तावावर मतदान घेऊन इम्रान खान यांना धोका देऊ शकत नाही. त्यासाठी मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. माझे आणि इम्रान खानचे ३० वर्षांपासूनचे नातं आहे. त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर घालवण्यासाठी मतदान घेण्याची परवानगी देऊ शकत नाही,” असं सभापती कैसर यांनी म्हटलं आहे.