पंतप्रधान मोदींच्या रस्त्यात आले शेतकरी, सभा करावी लागली रद्द; पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंजाबच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐनवेळी रद्द करावी लागली सभा; गृह मंत्रालयाने जारी केलं निवदेन
पंतप्रधान मोदींच्या रस्त्यात आले शेतकरी, सभा करावी लागली रद्द; पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?
पंतप्रधानांचा अडकून पडलेला ताफा.

पंजाबच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. पंतप्रधानांची फिरोजपूर येथे रॅली होणार होती. मात्र, दौऱ्यात अडथळा निर्माण झाल्यानं पंतप्रधान 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले. अचानक झालेल्या या घटनेप्रकरणी केंद्री गृहमंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केलं असून, पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल झालेल्या हलगर्जीपणाबद्दल गंभीर दखल घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट देणार होते. त्यानंतर फिरोजपूर येथे पंतप्रधान कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्यात करण्यात आला.

केंद्रीय गृह मंत्रालयाने निवदेन प्रसिद्ध केलं असून, त्यात सुरक्षेतील कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी बठिंडा पोहोचले. त्यानंतर तेथून पंतप्रधान हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येतील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाणार होते. मात्र, पाऊस आणि दृश्यमानता कमी (poor visibility) असल्याने पंतप्रधानांना 20 मिनिटं प्रतिक्षा करावी लागली, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

त्यानंतर वातावरण आणि दृश्यमानता कायम राहिल्याने पंतप्रधानांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासाला जवळपास 2 तास लागणार होते. पंजाबच्या पोलीस महासंचालकांना याबद्दलची माहिती देऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली होती.

दरम्यान, हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापासून पंतप्रधानांचा ताफा 30 अंतरावर असतानाच मध्ये एक उड्डाणपूल आला. तिथेच रस्त्यात आंदोलकांनी रस्ता रोखलेला होता. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिटं अडकून पडला. या घटनेला केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक असल्याचं मानलं आहे.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने पुढे म्हटलं आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे ताफा पुन्हा बठिंडा विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आला. गृह मंत्रालयाने या घटनेची दखल घेतली असून, या घटनेला मोठी चूक म्हणून अधोरेथित करण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. सुरक्षा व्यवस्थेत कुणामुळे चूक झाली, हे सरकारला स्पष्ट करावं लागणार असून, त्यावर कारवाई करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in