Pune Audio Clip: 'तुमची तर सालटीच काढू', चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान

Chitra Wagh criticized to NCP and Rupali Chakankar: पुण्यातील कथित ऑडिओ क्लिपवरुन भाजपवर निशाणा साधणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शरसंधान साधलं आहे.
Pune Audio Clip: 'तुमची तर सालटीच काढू', चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान
Chitra Wagh criticized to NCP (फाइल फोटो, सौजन्य - Instagram)

पुणे: पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला करण्यात आलेला शिवीगाळ प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपवर आणि आमदार सुनील कांबळेंवर याप्रकरणी तुफान टीका केली. ज्याला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू.' असं म्हणत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. 'निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरला अभ्रद शिवीगाळ केली होती. त्यावर काय कारवाई करणार?' असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी यावेळी विचारला आहे.

पुण्यातील व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत चित्रा वाघ काय म्हणाल्या?

'कुठल्याही पक्षाचे कोणतेही लोकप्रतिनिधी असू दे. त्यांनी त्याठिकाणी आपली भाषा ही नीटच वापरायला पाहिजे. दुसरं उदाहरण देते. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणचे आमदार निलेश लंके याने तर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि तेथील महिला डॉक्टर यांना अभ्रद शिवीगाळ केली. ती शिवीगाळ एवढी घाणेरडी होती की, त्याठिकाणी त्या दोघी त्या दिवसापासून तिथे येतच नाहीएत.'

'आता फरक एवढा आहे की, सुनील कांबळे जे ते म्हणतायेत की, माझा आवाज नाही. पण जी कथित क्लिप समोर येतेय ज्यामध्ये त्यांचा फोटो दिसतोय त्याची क्लिप आहे. निलेश लंकेने केलेल्या घाणेरड्या, अभद्र शिवीगाळीची क्लिप नाही म्हणजे ते योग्य आहे असं म्हणायचं का?'

'आता कसं झालंय... की, कुठेच काही मिळत नाहीए. मग काय करायचं जुन्या क्लिप काढायच्या... त्या असतील-नसतील त्यामध्ये आणखी त्यात एडिटिंग करायचं. मी या वादात पडणार नाही की, तो आवाज सुनील कांबळेचा आहे किंवा नाहीए. असेल तर करा कारवाई. नसेल तर काय करायचं ते बघू. आता ते चाललेत त्यांनी मला सांगितलं. ताई मी पोलीस स्टेशनला चाललोय एफआयआर दाखल करायला.'

'पण ओढून-ताणून ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जे कोणी असतील त्यांना कुठेतरी फ्रेममध्ये बसवायचं. तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू. तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना पुढे करुन ज्या पद्धतीने चिखलफेक करताय त्याने तुमचे अपराध काही थांबत नाहीत. 354 ला पण आम्ही तोंड देऊ, ही काय कसली क्लिप आली आहे त्याला देखील तोंड देऊ. पण त्यामुळे या ज्या काही घटना घडतायेत त्याचं समर्थन नाही. त्यावर तुम्ही काय बोलताय हे सांगा. म्हणून शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.'

'या कुठल्याही गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही. पण म्हणून अशा गोष्टींचा आधार घेत जे टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाला होतोय त्याचा मात्र निषेध आहे. ज्या बोलणाऱ्या सगळ्या आहेत त्यांची तर कीव वाटते मला. एवढ्या घटना होताना त्याठिकाणी तुमचा आवेग कुठे जातो? पण चित्रा वाघवर बोलायला, भाजपवर बोलायला सगळे पुढे येतात. चालू दे.. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पण हाच जोर कायम ठेवा घडणाऱ्या घटनांसाठी सुद्धा आणि तिथे सुद्धा आवाज उठवा.'

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील भाजपच्या एका आमदाराने पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात प्रचंड व्हायरल होत आहे.

पुणे महापालिकेतील ड्रेनेज विभागातील काही बिलं थकीत असून त्याचे पैसे संबंधित ठेकेदारांना तात्काळ देण्यात यावे यासाठी भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिविगाळ केल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र 'मुंबई तक' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

भाजपसारख्या असंस्कृतपणाच्या चिखलात ही अशीच कमळं उगवणार: रुपाली चाकणकर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. पाहा रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या:

'भाजप आमदार सुनील कांबळे यांनी त्यांच्या नालायकपणाच्या आणि बेशरमीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ठेकेदारांनी न केलेल्या कामाची बिलं काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्या सुश्मिता शिर्के यांना त्यांच्या आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या. हे अतिशय संतापजनक आहे. पालिकेत आपली सत्ता आहे, आपण आमदार आहोत याचा माज सुनिल कांबळे आपण आपल्या घरी दाखवावा. पालिका कर्मचाऱ्यांवर नाही.'

'पालिका कर्मचारी हे ना तुमचे नोकर आहेत ना पक्षाचे कार्यकर्ते. की, त्यांच्यावर इतकी अरेरावी आणि माजोरडेपणा दाखवावा. सुश्मिता शिर्के आपण कायदेशीर कारवाई करावी. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तुमच्यासोबत ठामपणे उभा राहील. आज सुनिल कांबळे ज्या पद्धतीने बोलले आहेत त्यांच्या बोलण्यातून महिलांना दुय्यम स्थान देणं. त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं. यावरुन एक दिसून येतं की, भाजपसारख्या नीचपणाच्या आणि असंस्कृतपणाच्या चिखलात ही अशीच कमळं उगवणार. कारण त्यांची मातृसंस्था असलेल्या आरएसएएसचे हे संस्कार आहेत.'

'मात्र महाराष्ट्रातील सुजाण जनता अशाप्रकारच्या प्रवृत्तीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सुनिल कांबळे आपण सुश्मिता शिर्के यांची जाहीर माफी मागावी. याप्रकरणी आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.' असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.

Related Stories

No stories found.