संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला

"२०१९ मध्ये काय झालं ते संपूर्ण देशानं पाहिलं" : चंद्रकांत पाटलांचा तिसऱ्या आघाडीवरून विरोधकांना टोला
संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला

भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अपशब्द वापरला. संजय राऊतांकडून सातत्याने असे शब्द प्रयोग केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देत विनंती केली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "आजपर्यंत जे केलं ते उघड पडलेलं आहे आणि कारवाई होईल. तसेच आपल्यावरच नाही तर कुटुंबातील लोकांवर देखील होईल, अशी भीती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. अशीच स्थिती आत्ता संजय राऊत यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहे."

"मी मागील दोन दिवसांपासुन उद्धवजींना विनंती करीत आहे. त्यांना जरा आवरा. शिवसेना संपवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे, असं दिसत असून त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडत आहे", अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

"मला मागील २७ महिन्यांमध्ये शिवसेनेचे एकही प्रवक्ते दिसत नाही. अनिल देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणीच बोलत नाही. एकमेव प्रवक्ते. त्यांना एकच काम मोदींना शिव्या, केंद्राला शिव्या, राज्यपालांना शिव्या यातून शिवसेनेची प्रतिमा बिघडत आहे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना भXवा शब्द वापरला होता. त्याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले की, "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कडक शब्दात बोलायचे. परवा तर त्यांनी भXवा शब्द वापरला," असं पाटील म्हणाले.

त्यांना मध्येच थांबवत उपस्थित असलेल्या पत्रकारांने आज XX शब्द वापरला आहे, असं सांगितलं. त्यावर पाटील म्हणाले, "XX शब्द अनेक वेळा ते वापरतात. मला वाटतं की जो पर्यंत उद्धवजींना राज्य चालवयाचं आहे. तोपर्यंत राज्य चालवताना त्यांनी बिघडत चालल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे", असा सल्ला पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या ठाकरे-पवारांसोबतच्या भेटीबद्दल पाटील म्हणाले, "२०१९ मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. जेव्हा मतमोजणी होती, तेव्हा सर्व नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. मग काय झालं, ते देशानं पाहिलं आहे. आता २०२४ मध्ये मोदीजी ४०० च्या खाली येणार नाही," असा दावा पाटलांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in