सातारा जिल्हा बँक पुन्हा वादात : पहिलीच बैठक पंचतारांकित हॉटेलमध्ये, संचालक मंडळावर टीका

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शह-काटशह, आरोप-प्रत्यारोप आणि दिग्गज नेत्यांच्या पराभवामुळे गाजलेली सातारा जिल्हा बँक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाला त्यांच्या पहिल्याच निर्णयामुळे टीकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. पहिल्या सभेसाठी बँकेची वास्तू असतानाही महाबळेश्वर येथील ला मेरिडीअन हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी यावर टीका केली आहे.

नव्या प्रतिनिधींना कामकाजाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेण्याची पद्धत असते. सर्वच स्तरांवर अशा कार्यशाळा घेतल्या जातात. जिल्हा बँकांवर निवडून येणारे प्रतिनिधी देखील त्यास अपवाद नाहीत. काही संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाबार्डच्या नियमांनुसार नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची कार्यशाळा एक महिन्याच्या आत घेणं बंधनकारक आहे. त्यानुसार ही कार्यशाळा घेतली गेली. या कार्यशाळेत संचालकांना कर्तव्ये, जबाबदाऱ्या व सहकार क्षेत्राच्या पुढील आव्हानांची माहिती दिली जाते.

राज्य बँकेचे अध्यक्ष, सहकार आयुक्त, आणि नाबार्डचे सीजीएम यांनी या बैठकीत संचालकांना मार्गदर्शन केलं. यावेळी बँकेचा अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित होता. या कार्यशाळेला शिवेंद्रराजे भोसले, ज्ञानदेव रांजणे, शेखर गोरे आणि उदयनराजे भोसले हे अनुपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संचालकांनी या बैठकीचं समर्थन केलं असलं तरीही विरोधकांनी यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक जयकुमार गोरे यांनी संचालक मंडळावर टीका केली. ‘या कार्यशाळेत संचालकांनी नक्की काय खाल्लं आणि ते का प्यायले याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल. मी संचालक असताना हॉटेलमध्ये बैठका झाल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये झाल्या नव्हत्या. शिवाय, मी अशा बैठकांना जात नव्हतो’, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षाचे नेते आणि जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झालेल्या शंभुराज देसाईंनी या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. संचालक मंडळाला कार्यशाळा घ्यायची होती तर ती शेतकऱ्याच्या बांधावरही घेता आली असती. मात्र असं न करता विरंगुळा म्हणून थंड हवेच्या ठिकाणी अशा कार्यशाळा घेणं आक्षेपार्ह असल्याचं शंभुराज देसाईंनी बोलून दाखवलं.

ADVERTISEMENT

जिल्हा बँक ही सामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर चालणारी बँक आहे. शेतकरी प्रचंड विश्वासाने या बँकेत पैशांचे व्यवहार करत असतो आणि असं असताना कार्यशाळेवर वारेमाप खर्च केला जातो, यावर बँकेतील नेत्यांनी थोडातरी विचार करायला हवा होता. आपण सामान्य शेतकऱ्यांचे नेते आहात हे विसरू नका, अशा शब्दात जाणकारांनी नेत्यांना सुनावलं आहे.

गेले १५ ते २० वर्षे जे संचालक म्हणून निवडून येत आहेत त्यांना कार्यशाळेची गरजच काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नवीन सदस्य अनुभवातून शिकले असते आणि कार्यशाळाच भरवायची होती तर जिल्हा बँकेच्या सभागृहात भरवता आली असती. पंचतारांकित हॉटेलचा एका दिवसाचा खर्च लाखोंच्या घरात असतो, हा खर्च वाचला असता. यातून शेतकऱ्यांचा आणि बँकेचा फायदाच झाला असता, असाही सूर उमटत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT