'तो हाच रस्ता आहे का?'; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना सवाल, संजय राऊतांच्या अटकेवरही भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले...
शरद पवार, नरेंद्र मोदी, संजय राऊत
शरद पवार, नरेंद्र मोदी, संजय राऊत

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची सुटकेचा मुद्दा देशभरात गाजत आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरूनही शरद पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लालकिल्ल्यावरील भाषणाचा हवाला देत बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकेबद्दल प्रश्न उपस्थित केले.

"बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले, हे सगळ्यांना माहितीये. हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयानं या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकारनं गुन्हेगारांना चांगली माणसं म्हणून सोडून दिलं. हाच महिलांचा सन्मान आहे का?", असा उपरोधिक सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदींचं १५ ऑगस्टचं भाषण, शरद पवारांचा सवाल

"सर्वांनी पंतप्रधान मोदींचं १५ ऑगस्टचं भाषण ऐकलं. त्यात ते महिलांविषयी खूप चांगलं बोलले. महिलांच्या सन्मानाविषयी बोलले. एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशाला महिलांविषयी जी दिशा दाखवली तो हाच रस्ता आहे का? यातून सरकार देशाला काय संदेश देत आहे", असा प्रश्न शरद पवार यांनी मोदींना केला.

"नवाब मलिकांची काय चूक होती?

नवाब मलिक यांच्या अटकेवरूनही शरद पवार यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. "आज सत्ता त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्याविरोधात चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जाते. अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं. त्यांच्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला", असं पवार म्हणाले.

"नवाब मलिक यांची काय चूक होती? 20 वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता. दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई होत आहे. चुकीचं काम केलं, तर आमचं समर्थन नाही. केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर होतोय", असं शरद पवार म्हणाले.

संजय राऊत यांच्या अटकेवर शरद पवार काय म्हणाले?

"देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे, पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता नाही. जिथे नव्हती तिथे आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची सत्ता नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्याने भाजपची सत्ता आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहीत होते म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत", असं सांगत शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून मोदींवर सरकारवर हल्ला चढवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in