Sharad Pawar: पूरग्रस्त भागांना भेट देणाऱ्या नेत्यांना शरद पवारांकडून कानपिचक्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील पूर परिस्थितीबाबत नेमकी माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. मात्र, यावेळी बोलताना शरद पवारांनी पूरग्रस्त भागांना भेट देणाऱ्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी लातूर भूकंपाच्या वेळी कशाप्रकारे पंतप्रधान नरसिंह राव यांना त्यांचा तात्काळ दौरा करण्यापासून परावृत्त केलं होतं यांची देखील माहिती दिली.

सध्या महाड तालुक्यातील तळीये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पूर, भूस्खलन यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी आता अनेक नेते या भागांना भेटी देत आहे. अशा ठिकाणी नेत्यांनी किंवा इतर मंत्र्यांनी भेट दिल्यास तेथील बचाव कार्य किंवा पुनर्वसनाच्या कामावर त्याचा सगळा परिणाम होतो त्यामुळे नेत्यांनी अशा प्रकारच्या दुर्घटनाग्रस्त भागाचं राजकीय पर्यटन टाळावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

पाहा याबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘नैसर्गिक आपत्तीत नेत्यांनी दौरा केल्यानंतर त्या भागातील सर्व यंत्रणा ही संबंधित नेत्यांच्या मागे फिरवावी लागते. यामुळे तेथील बचाव कार्यात किंवा पुनर्वसन कामात बराच अडथळा निर्माण होतो. यामुळे मी स्वत: देखील तिथे पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेलो नाही. कारण आता सध्या तिथे प्राधान्याने पुनर्वसनाचं काम होणं आवश्य आहे.’

‘माझं असं मत आहे की, प्रत्येक नेत्याने यावेळी प्रसंगावधान राखलं पाहिजे. म्हणूनच मी स्वत: सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. कारण की, मी जर तिथे गेलो तर त्याठिकाणी इतर प्रशासकीय यंत्रणा देखील फिरवावी लागते. मला असं वाटतं की, अशाप्रकारे आपल्याभोवती यंत्रणा फिरत ठेवणं हे काही योग्य नाही.’

ADVERTISEMENT

‘राजकीय दौऱ्यांमुळे नागरिकांना धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. ज्याचा परिणाम तेथील एकूण कामकाजावर होतो. त्यामुळे अशाप्रकारचे दौरे होऊ नये असं माझं मत आहे.’ असं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे इतर नेत्यांना आणि विशेषत: विरोधी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दुर्घटनास्थळी गेलंच पाहिजे’

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या पालकमंत्री यांनी तिथे गेलेचं पाहिजे. शेवटी ग्राऊंड रियालिटी काय आहे आणि लोकांना धीर देणं हे देखील गरजेचं आहे. आता समजा, मी तिथे गेलो तर मला खात्री आहे की, तेथील यंत्रणा माझ्यासाठी थांबेल. पण तिथे संकटात जे लोक आहे त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यामुळे शक्यतो माझ्यासारख्यांनी तिथं जाणं टाळावं असं मला वाटतं.’ असंही पवार यावेळी म्हणाले.

‘तेव्हा मी स्वत: पंतप्रधानांना सांगितलं होतं तुम्ही आता इथे येऊ नका’

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी आपत्कालीन परिस्थिती असताना आपण तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरला येण्यापासून कसं थांबवलं होतं याबाबतचा किस्सा देखील सांगितला.

यावेळी पवार म्हणाले, ‘माझा लातूर भूकंपच्या वेळचा एक अनुभव आहे. लातूर भूकंपाच्या मदत कार्याची आणि पुनर्वसनाची जबाबदारी माझ्याकडे होती. तेव्हा मी लातूरला होता आणि आम्ही सगळे कामात होतो. त्याचवेळी तेव्हाचे पंतप्रधान नरसिंह राव हे लातूरला भेट देणार होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, आपण किमान दहा दिवस तरी इकडे येऊ नका. जर तुम्ही इथे आलात तर इकडची सगळी यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी तिकडे हलवावी लागेल. त्यावेळी पंतप्रधानांनी देखील माझी ही विनंती मान्य केली आणि ते दहा दिवसाने लातूर दौऱ्यावर आले होते.’

Governor भगतसिंह कोश्यारी रायगड आणि रत्नागिरीच्या पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील पूरग्रस्त भागाचा आज दौरा करत आहेत. त्याविषयी पवारांना विचारलं असता ते असं म्हणाले की, ‘ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही, त्यांनी या भागांचा दौरा टाळावा. ठीक आहे‌ राज्यपाल जात आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध‌ चांगले आहेत‌. ते‌ जास्त मदत आणू शकतात.’ असा टोला देखील यावेळी पवारांनी लगावला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT