तीच भाजपाची मंडळी इथं आपली माथी भडकवतायेत आणि आपण...; अरविंद सावंतांचं ST कामगारांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत यांनी पत्र लिहून एसटी कामगारांना कामावर परतण्याचं केलं आवाहन...
तीच भाजपाची मंडळी इथं आपली माथी भडकवतायेत आणि आपण...; अरविंद सावंतांचं ST कामगारांना पत्र
एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत.

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतरही अद्याप आंदोलन सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कामावर परतण्याचं भावनिक आवाहन केलं आहे. विविध मुद्दे मांडत अरविंद सावंत यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे.

अरविंद सावंत यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं...

प्रिय एसटीतील सुज्ञ कर्मचारी, कामगार बांधवानो, भगिनींनो

जय महाराष्ट्र !!

दिवाळीपासून आपण सर्वजण हळूहळू संपात सामील झालात आणि आपल्याच प्रवाशांना ऐन दिवाळीत आपण जे 'प्रवाशांच्या सेवेसाठी' ब्रीद मिरवतो त्या सेवेपासून निव्वळ वंचित नव्हे, तर वेठीस धरण्याचं काम केलं.

बांधवानो, भगिनींनो, होय हे कबूल आहे की एसटीतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन कमी आहे. पण, हे माहीत असतानाही आपण नोकरी स्वीकारली. त्यातही आताच कुठे कोरोनाच्या बंधनातून आपण थोडेसं मोकळं होऊन आपली सेवा सुरु झाली. थोडासा महसूल येऊ लागला आणि आपण हा संप केला. अंतर्मुख व्हा, शेजारील कर्नाटकमधे भाजपाचे सरकार आहे. तेथेही एसटी कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी १५ दिवस संप केला. त्याचं काय झालं याची माहिती घ्या, ही विनंती.

तीच भाजपाची मंडळी इथे आपली माथी भडकवितायेत आणि आपण त्यांच्या राजकारणाला बळी पडतोय. कोरोनाच्या संकटात आमच्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं, त्यांचा आम्हाला अभिमानच आहे. परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला गेला याचीही आपल्याला जाण असायला हवी. एव्हढंच नव्हे तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसहाय्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडून मिळवलं म्हणून पुढील पगार मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसं आपलं घर तुटपुंज्या पगारावर चालवणं कठीण वाटतं तसेच सरकारचंही आहे. तुटपुंज्या उत्पन्नावर एका मागोमाग एक अशी संकटाची मालिका सुरु असतानाही सरकार आपणास मदत करीत आहे. आपल्या प्राथमिक मागणीनुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून दिला; वर बोनसही दिला आणि ही सर्व रक्कम दिवाळी पूर्वीच्या पगारात दिली गेली. पगारात किमान २५०० ते ८००० रुपये अधिक पगारवाढ मिळाली.

आज एसटीतील किमान पगार १६००० आहेत. पण त्यावर समाधान न मानता आपण सर्वांनी ऐन दिवाळीत सरकार आणि जनतेला वेठीस धरून वि्लिनिकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप करण्याचा जो निर्णय घेतला, त्याला संयुक्त कृती समितीतील एकाही संघटनेनं पाठिंबा दिलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आंदोलन कुणी सुरु केलं. डेपोंना कुणी टाळी ठोकली. त्यांचा एसटी कर्मचाऱ्यांशी काय संबंध?

सुरुवातीला हातावर मोजता येतील एव्हढेच डेपो बंद होते. मग भाजपाचे पडळकर आणि मंडळी पुढे आली आणि त्यांनी आगीत तेल ओतत हे आंदोलन हाती घेतलं. भाजपाचे आमदार, स्थानिक पदाधिकारी डेपो डेपोत जाऊन टाळी ठोकू लागली. मग एक दोन अन्य राजकीय पक्षांनीही पोळी भाजण्याचा स्वार्थ साधला. आणि हे आंदोलन पेटवलं. मागील पाच वर्ष भाजपचं सरकार होतं. तेव्हा राज्यही आर्थिक संकटात नव्हते, मग का नाही वि्लिनिकरण केलं? उलट तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवारांनी स्पष्ट सांगितलं की 'विलिनीकरण करता येणार नाही. आम्ही त्यांना मदत करू शकतो.' हे उद्गार केव्हाचे आहेत, जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती उत्तम होती तेव्हाचे!

मग आता जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीची आहे. त्यात आमच्या हक्काचे जीएसटीचे ४०,००० कोटी रुपये केंद्र सरकारने आजवर दिलेले नाहीत. त्या काळात आपण ही मागणी रेटतो आहोत, हे कुठल्या व्यावहारिक माणसाला पटेल? तेही जेव्हा एसटीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असती, तेव्हा आम्ही संप केला हे योग्य नाही झालं. वंदनीय शिवसेनाप्रमुख म्हणायचे हक्क मागताना कर्तव्याला विसरु नका! याचा आपल्याला विसर पडला.

आम्हाला फोन करणारे, मेसेज करणारे, आम्ही शिवसैनिकच आहोत हे सांगतात त्यांच्यासाठी हे बाळकडू! शिवसेनेचे पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते किती कनवाळू आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहे. त्यांना आपल्याच कर्मचाऱ्यांचं भलं करावं असं वाटत नाही का? खरं तर, आपण नोकरी महामंडळाची स्वीकारली आहे. सरकारची नाही, हे मुळातच विसरलोय. आणि वडाची साल पिंपळला लावा अशी मागणी आपण करतोय.

होय, मला हे मान्य आहे की नवीन कामगारांना पुरेसा पगार नाही, तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू पण आपणही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पहिले कर्तव्यावर रुजू व्हा त्यातच तुमचे, एसटी महामंडळाचे भले आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण जगतो त्या प्रवाशांचे आशीर्वाद त्यामुळे आपणांसच मिळतील.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

जय महाराष्ट्र !!

आपला

अरविंद सावंत

(खासदार आणि अध्यक्ष, एसटी कामगार सेना)

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in