मुंबईत घर परवडत नाही म्हणत शिवसेना आमदाराने केला म्हाडाकडे घरासाठी केला अर्ज

जाणून घ्या कोण आहे आमदार? आणि त्यांनी कुठे केला आहे अर्ज?
मुंबईत घर परवडत नाही म्हणत शिवसेना आमदाराने केला म्हाडाकडे घरासाठी केला अर्ज

मुंबईत घर घेणं हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरांच्या किंमती प्रचंड असल्याने सर्वसामान्य माणसांना घर खरेदी करणं कठीण असतं. त्यामुळेच म्हाडा आणि सिडकोने अल्प किंमतीत किंवा परवडणाऱ्या दरांमध्ये घरांची लॉटरी काढत असते. सामान्य माणसं या घरांसाठी अर्ज करत असतात. आता एका शिवसेना आमदाराने घरासाठी अर्ज केला आहे. मुंबईत घराची किंमत परवडत नसल्याने शिवसेना आमदाराने हा अर्ज केला आहे.

म्हाडाने आपल्या कोकण मंडळातून 8984 घरांची लॉटरी जाहीर केली. या लॉटरीत शिवसेनेच्या आमदाराने घरासाठी अर्ज केला आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी हा अर्ज केला आहे. दोन योजनांमध्ये श्रीनिवास वनगा यांनी अर्ज केला आहे. पहिला अर्ज ठाण्यातील घरांसाठी आहे तर दुसरा अर्ज मुंबईतील घरासाठी आहे.

श्रीनिवास वनगा यांचं म्हणणं काय?

'मला जेव्हा जेव्हा मुंबईला यायचं असेल तेव्हा भाडे तत्त्वावर अपार्टमेंटमध्ये रहावं लागतं. मुंबईतील अपार्टमेंटचं भाडे हे एका एक लाख रूपयांपर्यंत गेलं आहे, ते परवडणारं नाही त्यामुळे मी मुंबईत घर शोधतो आहे. मी पालघर जिल्ह्यातील एका टोकाला म्हणजेच गुजरातच्या सीमेजवळ राहतो. ठाण्यात पोहचण्यासाठी मला तीन तास लागतात. त्यामुळे मी असं घर शोधतो आहे जे मंत्रालय-विधानसभा गाठण्यासाठी सोयीचं ठरेल.

म्हाडाच्या घरांसाठीच्या लॉटरीत खासदार आणि आमदारांसाठी एक विशेष कोट्या अंतर्गत घरे राखीव आहेत. त्या अंतर्गतच आमदार श्रीनिवास वनगा यांनी घरासाठी अर्ज केला आहे. केवळ त्यांनीच नाही तर इतरही राजकीय मंडळीनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. आमदार वनगा यांनी ज्या घरांसाठी अर्ज केला आहे त्यापैकी एक घर घणसोली येथे आहे. जे 41.93 स्क्वेअर मीटर असून त्याची किंमत 20.70 लाख रुपये इतकी आहे.

कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत 8 हजार 984 घरांसाठी लॉटरी काढण्यात येत आहे. कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत 6 हजार 180 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 624 सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 586 सदनिका, सर्व्हे क्रमांक 162 खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 2016 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथे 1769 सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे 1185 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) 15 सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील 1 हजार 742 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथील 88 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे 36 सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 2 सदनिका, सर्व्हे क्रमांक 216 पीटी, 221 पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे 196 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक 491, 23 पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 1 सदनिका सोडतीत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in