शिवसेना : “शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील का?”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय. याच प्रकरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. त्याचाच धागा पकडत शिवसेनेनं (Shiv sena) आता भाजपला (Bjp) सुनावलं आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) सरसंघचालक भागवत यांचा हवाला देत निशाणा साधला आहे.

सरसंघचालकांच्या भूमिकेवर शिवसेना काय म्हणाली?

शिवसेनेनं सरसंघचालकांच्या भाषणांचा उल्लेख करत ज्ञानव्यापी मशीद प्रकरणावर भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका व्यक्त केली आहे, ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, ‘आमचेच खरे’ असा कट्टरवाद नको.’ भागवत यांची भूमिका हिंदुत्ववादी असली तरी संयमाची आहे. भागवत म्हणतात, ज्ञानवापीशी हिंदूंच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. एकापरीने सरसंघचालकांनी देशातील सध्याच्या वातावरणावर परखड मत व्यक्त केले आहे, पण शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील काय?”

“ही भारतभूमी सर्वांना सामावून घेणारी आहे. कुणालाही न बदलवणारी, प्रत्येकाच्या पूजा पद्धतीचा सन्मान राखणारी आहे. या परंपरेला अनुरूप असेच हिंदूंनी स्वतःचे आचरण ठेवावे, असंही सरसंघचालक म्हणतात. या देशातील हिंदूंचे आचरण परंपरेला साजेसेच आहे, पण हिंदूंची व मुसलमानांची डोकी भडकविण्याचं काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीच्या वेळी ‘यापुढे इतर मंदिर-मशिदींच्या वादात संघ पडणार नाही’ अशी भूमिका सरसंघचालकांनी मांडली. ती संयमी भूमिका हिंदुत्ववाद्यांच्या पचनी पडली नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

“वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आहे व ती जागा हिंदूंच्या ताब्यात यावी असे या मंडळींना वाटते. त्यामुळे देशातील वातावरण पुन्हा गढूळ होऊ शकते. शिवलिंग फक्त ज्ञानवापी मशिदीतच नाही, तर आग्र्यातील ताजमहालखाली व दिल्लीच्या लाल किल्ल्याखालीही असल्यानं या दोन्ही वास्तू हिंदूंच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी भाजपपुरस्कृत हिंदुत्ववाद्यांनी केली. देशात नव्हे, तर जगभरात नक्की कोणत्या वास्तूखाली शिवलिंग आहे याची अधिकृत यादी या हिंदुत्ववाद्यांनी प्रसिद्ध केली पाहिजे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

ADVERTISEMENT

“मुळात या शिवभक्तांनी एक विषय नीट समजून घेतला पाहिजे. शिवशंकर हे ज्या कैलास-मानसरोवर येथे विराजमान आहेत, ते कैलास- मानसरोवर आजही चीनच्या ताब्यात आहे व चीनच्या परवानगीशिवाय तेथे हिंदू श्रद्धाळूंना जाता येत नाही. त्यामुळे ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, जामा मशीद, लाल किल्ल्याखालचे शिवलिंग शोधण्यापेक्षा शिवलिंगाचा निर्माता महादेव शंकराचे कैलास- मानसरोवर आधी ताब्यात घेतले पाहिजे.”

“अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश हे हिंदुस्थानचेच भाग होते. तेथील अनेक मशिदींखालीही शिवलिंग असू शकेल. मग या देशांवर आक्रमण करून मशिदी ताब्यात घ्यायचा विचार आहे काय? मशिदीखाली शिवलिंग आढळत असल्यामुळे हिंदुत्वाचे रक्षण करण्याची स्वयंभू जबाबदारी काही मंडळींनी घेतली आहे. प्रत्येक मशीद व दर्ग्याखाली ते शोध घेत आहेत, पण त्यामुळे कश्मीरातील हिंदूंचा रक्तपात कसा थांबणार?,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

“कश्मीर खोऱ्यात हिंदूंच्या बाबतीत 1990 सालासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदू नागरिकांना घरात व कार्यालयात घुसून मारले जात आहे. हिंदूंनी पुन्हा एकदा कश्मीरातून पलायन सुरू केले आहे. शिवलिंग शोधण्याच्या मोहिमा राबविणाऱ्यांच्या खिजगणतीत हा आक्रोश व रक्तपात आहे काय?”

“मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून स्वीकारली आहे, येथील सर्वसमावेशक भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, असे सरसंघचालकांनी अधोरेखित केले. हा विचार सध्याच्या वातावरणात मोलाचा आहे. भागवत यांनी कान टोचले हे खरेच, पण कान टोचून काही उपयोग होईल का? की ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असेच पुन्हा घडणार आहे.”

“मशिदींखालचे शिवलिंग हा जसा काही जणांसाठी चिंतेचा विषय आहे, तसा मग पोर्तुगीज आक्रमकांनी गोव्यासारख्या राज्यात मंदिरे पाडून तेथे त्यांचे चर्च उभारल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या चर्चखालीही शिवलिंग शोधायचे काय? म्हणूनच सरसंघचालकांनी जे सांगितले त्यावर अंमल व्हावा अन्यथा तणाव आणि स्फोटांचे भय कायम राहील. मशिदींखाली शिवलिंगाचा शोध घेणारे सरसंघचालकांनी आता जे सांगितले त्यापासून तरी बोध घेणार आहेत का?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT