लखीमपूरमधील केंद्रीय मंत्रीपुत्राचे प्रताप अन् कोकणातील हल्ला सारखाच; नितेश राणेंवरून सेनेचा फडणवीसांवर निशाणा

माकडचेष्टा, पडळकरांवरील हल्ला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, जयंत पाटलांवरील आरोप ते राष्ट्रपती राजवट; शिवसेनेनं भाजपचा घेतला समाचार
लखीमपूरमधील केंद्रीय मंत्रीपुत्राचे प्रताप अन् कोकणातील हल्ला सारखाच; नितेश राणेंवरून सेनेचा फडणवीसांवर निशाणा
(फोटो सौजन्य: विधानसभा)

हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. या अधिवेशनातही विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पायऱ्यावर नितेश राणेंनी काढलेल्या मांजरीच्या आवाजाचा मुद्दाही सभागृहात गाजला. तर संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सभागृहाबाहेर पडसाद उमटले. या सर्वच मुद्द्यांवरून शिवसेनेनं आता भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत.

शिवसेनेचे विरोधकांना अग्रलेखातून फटकारे

"महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. पण ते राज्यघटनेनुसार चालू दिले जात आहे काय? घटनेनुसार ज्यांनी राज्य चालवायचे ते आपले सन्माननीय राज्यपालच राज्यात घटनात्मक कोंडी करताना दिसत आहेत. ही कोंडी भारतीय जनता पक्षाच्या सोयीसाठी केली जात असेल तर तो सरळ सरळ राजकीय हस्तक्षेप आहे. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जे रामायण, महाभारत घडवले गेले व त्याद्वारे शेवटपर्यंत विधानसभेला अध्यक्षच लाभू दिला गेला नाही, याची जबाबदारी शेवटी कोण घेणार?"

"राज्यपाल घटनाबाह्य पद्धतीने वर्तन करतात व त्यांच्याशी संघर्ष केला की भाजपचे पुढारी राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची भाषा करणार, याला आता जनता विटली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असून राजभवनात बसून आपणच राजशकट हाकत असल्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख मंडळींना पडले आहे. दोन वर्षांपासून या मंडळींची झोप उडाली असताना जागेपणी त्यांना स्वप्ने पडतात. याचाच अर्थ त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे."

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आठवडय़ात दोनदा केली आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतची सर्व कारणे ठाकरे सरकारने पूर्ण केल्याचे पाटील सांगतात. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्यपालांना विश्वासात घेतले नसल्याच्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे वक्तव्य भाजपच्या प्रांताध्यक्षांनी करावे हे आश्चर्यच आहे. सरकार त्या कारणाने बरखास्त होऊ शकते असे पाटील म्हणतात हे त्यांचे अज्ञान आहे."

"एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून बेळगावच्या लढ्यापर्यंत विरोधी पक्षाचे नेतेच महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनून लढे देत होते. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला एक महान परंपरा लाभली आहे. विरोधी पक्ष हा सरकारइतकेच महत्त्वाचे कार्य करीत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून 'मांजरचेष्टा' करतो. डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वतःचे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचे व काळीज उंदराचे अशीच झाली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे 'माकडचेष्टा' म्हटले जाते. कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्याने तो जे काही उलटसुलट करीत आहे त्या 'मांजरचेष्टा'च ठरत आहेत."

"विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कधीकाळी अभ्यासपूर्ण भाषणांसाठी प्रख्यात होते. आज ते खोट्या गोष्टींसाठी त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवीत आहेत. जयंत पाटील यांना जे ओळखतात त्यांना खात्रीने सांगता येईल की, कुणाला इजा करणे, कुणावर हल्ला घडवून आणणे अशी अचाट कामे करण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही. पण भाजपचे एक आमदार पडळकर यांनी पाटलांनी आपल्यावर कसे मारेकरी घातले व आपण त्यातून कसे बचावलो याचे रसभरीत वर्णन केले व विरोधी पक्षनेते फडणवीसांनी त्यावरून सरकारवर हल्ले केले. विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा अशामुळे कमी होत असते याचे भान तरी माजी मुख्यमंत्र्यांनी ठेवायला नको काय? आता या बनावट, फुसक्या प्रकरणांचा आधार घेऊन भाजपवाले महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणार आहेत काय?"

"विरोधी पक्षनेत्यांनी पडळकरांवरील हल्ल्याबाबत सभागृह डोक्यावर घेतले, पण सिंधुदुर्गात संतोष परब या शिवसैनिकावर निर्घृण असा खुनी हल्ला झाला. भारतीय जनता पक्षाच्या उपऱ्या लोकांनी संतोष परब यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी परब यांच्यावरील हल्ल्यावर प्रश्न का उपस्थित केला नाही? सिंधुदुर्गात गेल्या तीसेक वर्षांत अनेक राजकीय हत्या करण्यात आल्या व पचवून ढेकर देण्यात आले. राजकीय वरदहस्ताशिवाय ते शक्य नाही."

"श्रीधर नाईकांपासून रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते, पण परबांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. पडळकर यांचे प्राण मोलाचे व संतोष परब यांचे मातीमोलाचे असे विरोधी पक्षनेत्यांना वाटत असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या हल्ल्याकडे गांभीर्याने पहायला हवे व त्याचा तटस्थ अहवाल केंद्राकडे पाठवायलाच हवा. लखीमपूर खिरीतले केंद्रीय मंत्रीपुत्राचे प्रताप आणि कोकणातले हत्या व हल्ल्यांचे प्रताप यात साम्य आहे. मदांध हत्तीप्रमाणे उधळलेल्या या लोकांना वेसण घालण्याची जबाबदारी ठाकरे सरकारची आहे. ठाकरे सरकार बरखास्त करावे हे भाजप नेत्यांचे डाव आहेत. मांजरांनी म्याव म्याव न करता शेपट्या घातल्याची ही साक्ष आहे. कायद्याचे राज्य बेकायदेशीरपणे बरखास्त करता येणार नाही याची खूणगाठ मनाशी बांधा व शांत बसा!', असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in