Narayan Rane : कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी, उद्याच्या सभेत नावं जाहीर करणार-राणे

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात रंगणार सामना
Narayan Rane : कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी, उद्याच्या सभेत नावं जाहीर करणार-राणे

चिपी विमानतळाचा उद्गघाटन सोहळा उद्या पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य लक्षवेधी आहे. कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी सुरू आहे, जे हप्ते घेतात त्यांची नावं मी सभेत जाहीर करणार आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्ग या ठिकाणी असलेल्या चिपी विमानतळाचं उद्घघाटन असल्याने एकमेकांचे राजकीय वैरी आणि कट्टर विरोधक असणारे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. उद्या सिंधुदुर्गात काय सामना रंगतो ते पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. विमातळावर सुरू असलेल्या पोस्टर वॉरमुळे कार्यक्रमात काय होणार याचा ट्रेलर बघायला मिळाला आहेच. आता शिवसेनेतल्या हप्तेखोरांची नावं कार्यक्रमात सांगणार असल्याचं नारायण राणेंनी जाहीर केलं आहे.

नारायण राणे
नारायण राणे

नारायण राणे काय म्हणाले?

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होणार आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. 1997 -98 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून विमानतळ या जिल्ह्यात असलं पाहिजे अशी माझी इच्छा होती. प्रफुल्ल पटेल यांनी ग्रीनफिल्ड विमानतळ आलं त्यावेळी मंजुरी दिली होती. 15 ऑगस्ट 2009 ला या विमानतळाचं भूमिपूजन झालं. ज्यावेळी भूमिपूजन झालं तेव्हा शिवसेनेने या विमानतळाला विरोध केला होता. आज श्रेय घेणारे विनायक राऊत हे त्यावेळी विमानतळ नको म्हणून आंदोलन करत होते असंही नारायण राणे यांनी सुनावलं आहे.

2014 ला विमानतळ बांधून पूर्ण झालं, मात्र मधल्या काळात काहीही झालं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यावेळी कडाडून विरोध करणारे आज श्रेय घ्यायला पुढे येत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सिंधुदुर्गातील उद्योजकांना प्रचंड त्रास देणं सुरू आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम करण्यासाठीही अडवणूक करण्यात आली आहे. कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी सुरू आहे, या हप्तेखोराची नावं उद्याच्या कार्यक्रमात जाहीर करणार आहे. कोकणच्या विकासात अडसर ठरणारे हे लोक आहेत ज्यांची नावं मी जाहीर करणार आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.