"आज फक्त ट्रेलर दाखवलाय, पिक्चर अभी बाकी है" : गोकुळमधील राड्यानंतर महाडिकांचा इशारा

सत्ताधाऱ्यांनी पळपुटेपणा दाखवला, दूध उत्पादकांच्या नजरेला नजर भिडवून आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायचे धाडस त्यांनी केले नाही.
Shoumika Amal Mahadik
Shoumika Amal MahadikMumbai Tak

गोकुळ दूध संघाची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज प्रचंड गोंधळात पार पडली. यावेळी सभासदांना प्रश्‍न विचारण्यासाठी माईक मिळाला नाही. सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाचे आणि विरोधी महाडिक आघाडी यांच्याकडून जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. अध्यक्षांच्या भाषणावेळी अक्षरशः गोंधळाची स्थिती होती. सत्ताधारी गटाकडून ठराव मंजुरीच्या, तर विरोधी आघाडीकडून ठराव नामंजुरीच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. सभा सुरू झाल्यापासून सुमारे एक तास दहा मिनिटे प्रचंड गोंधळ सुरू होता. अशा तणावपूर्ण वातावरणात उपस्थितांचे आभार न मानताच, सभा उरकण्यात आली.

आज सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आघाडीने व्यासपीठासमोरील खुर्च्यांवर आपले कार्यकर्ते आणून बसवले होते. त्यामुळे अनेक सभासदांना बसायला जागा मिळाली नाही. संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीच्या सभासदांनी जोरदार घोषणा देत, सभागृहात प्रवेश केला. काही सभासदांच्या हातात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या समर्थनाचे फलक होते. तर विरोधी आघाडीच्या घोषणा सुरू असतानाच सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी प्रत्युत्तरात घोषणा दिल्या. त्यामुळं सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.

Shoumika Amal Mahadik
"रोहित पवारांचं भविष्य भाजपच्या लोकांनी सांगितलं", शरद पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे?

दुपारी 1 वाजता विश्वास पाटलांनी घेतली सुत्र हातात :

गोंधळाच्या वातावरणात 1 वाजता अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सभेला सुरुवात केली. अहवाल सालात संघाची उलाढाल 2 हजार 929 कोटी रुपये झाली आहे. सोबत खर्चात काटकसर करून तब्बल 10 कोटी रुपयांची बचत केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संघाच्या प्रस्तावित योजनांची माहिती दिली.

शौमिका महाडिकांचा संताप :

महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरण आणि डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावर अध्यक्ष बोलत असताना, काही सभासदांनी जोरदार घोषणा देत, हे दोन्ही ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी सभासदांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत, भाषण सुरूच ठेवले. त्यामुळे गोंधळात भर पडली.

यावेळी आबाजी, सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला असे म्हणतं शौमिका महाडिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांनी पळपुटेपणा दाखवला, दूध उत्पादकांच्या नजरेला नजर भिडवून आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायचे धाडस त्यांनी केले नाही. 'कर नाही त्याला डर कशाला' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. परंतु सत्तेत आल्यापासून यांच्या काळ्या कर्तृत्वाची यादी थांबेचना! अक्षरशः संघ ताब्यात घेण्यापासून ते सत्तेचा गैरवापर करत जे काही लाभ उठवता येतील त्यासाठीचे यांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत, असेही आरोप त्यांनी केले.

महाडिक पुढे म्हणाल्या, या सगळयाविरोधात दुध उत्पादकांच्या साथीने आवाज उठवून यांना सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि याठिकाणी प्रत्येक दुध उत्पादकाला मी आश्वस्त करू इच्छिते की, हा जो संघ तुमच्या घामातून उभा राहिला आहे, तो तुमच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कारण त्यासाठीची कायदेविषयक आणि रस्त्यावरच्या दोन्ही प्रकारच्या लढाईसाठीची धमक आपण बाळगून आहोत. आज त्याचं फक्त ट्रेलर दाखवलंय! 'पिक्चर अभी बाकी है!'

सभेत गोंधळ सुरू असतानाच अध्यक्षांनी ९ पानी भाषणाचे वाचन केले. त्यानंतर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सत्ताधारी गटाकडून प्रत्येक ठरावाला मंजूर-मंजूर अशा घोषणा दिल्या जात होत्या, तर विरोधी आघाडीकडून तितक्याच ताकतीने नामंजूरच्या घोषणा दिल्या जात होत्या.

विषय पत्रिका वाचन झाल्यानंतर प्रश्‍नोत्तरासाठी वेळ घेण्याची मागणी सभासदांनी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावत, लेखी प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे निर्देश दिले. सभासदांनी पाठवलेले लेखी प्रश्‍नही गोकुळचे अधिकारी वाचून दाखवत होते आणि त्याची उत्तरही तेच अधिकारी देत होते. त्यामुळे इतर सभासदांना प्रश्‍न विचारण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी सभागृहात गोंधळ वाढत गेला.

पाटील-मुश्रीफांचे प्रत्यूत्तर :

गोकुळ दूध संघाची सभा सव्वा तास चालली. यावेळी विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळातील कृत्यांचा उलगडा होऊ नये, त्यामुळे सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. सभेच्या प्रोटोकॉलनुसार अहवाल वाचन झाल्यानंतर प्रश्नोत्तर घेण्यात आली. विरोधकांनी जाणीवपूर्वक सभेत गोंधळ घालून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया सभेनंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी दिली.

तर आमदार सतेज पाटील यांनीही विरोधकांच्या कार्यकाळातील कामकाजावर टीका केली. त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय बंद केलेले टँकर त्यांच्या बंद झालेले ठेके उघडकीस येऊ नयेत यासाठीच विरोधकांनी सभेतून काढता पाय घेतला असा टोला मारला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in