एक अशी मशीद जिथे भोंग्यावरुन अजान होत नाही, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सध्या मशिदीवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आवाजाचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यातील पोलीस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईही करायला सुरुवात केली आहे. परंतू एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण रंगात आलेलं असताना रत्नागिरीतली एक मशिद आपल्या वेगळ्या प्रयत्नामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

रत्नागिरीच्या भर बाजारपेठेत मारुती आळीत परकार मशीद आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेल्या या मशिदीचं नुकतचं नुतनीकरण करण्यात आलं. परंतू या कामानंतरही मशिदीवर भोंगे लावण्यात आलेच नाहीयेत. परिसरातील मुस्लीम बांधवांनी मशिदीतील अजानसाठी एक अंतर्गत साऊंड सिस्टीम बसवली आहे. ज्याचा आवाज हा फक्त आत मशिदीत नमाज पढायला येणाऱ्यांनाच ऐकायला येतो. सुरुवातीपासूनच भोंग्यावरुन अजान न लावण्याचं या मशिदीचं कारणही तितकंच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.

हे वाचलं का?

रत्नागिरीतली सर्वात जुनी शाळा म्हणून ओळख असलेली पटवर्धन हायस्कूल ही याच परिसरात आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून सुरुवातीपासून या मशिदीतली अजान भोंग्यावर होत नसल्याची माहिती मशिदीचे ट्रस्टी इम्रान खलिफे यांनी दिली.

“1950 पूर्वीची ही मशीद आहे, तेव्हापासूनच या मशिदीतली अजान भोंग्यांवर होत नाही. या परिसरामध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात, आजूबाजूला व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणि मुख्य म्हणजे जवळच हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, जैन मंदिर आहे. आणि या मशिदीवर भोंगे नसण्याचं मुख्य कारण म्हणजे मशिदीच्या बाजूलाच रत्नागिरीतील सर्वात जुनी शाळा पटवर्धन हायस्कूल आहे. त्यामुळे शाळेला, व्यापारी वर्गाला, इथे राहणाऱ्या सर्व लोकांना कोणत्याही प्रकारचा आवाजाचा त्रास नको म्हणूनच सुरुवातीपासूनच आम्ही हा दंडक पाळत आहोत.”

या मशिदीचा संपूर्ण कारभार पाहणारे शकील मुर्तझा यांनी मुंबई तक शी बोलताना या भागातला जातीय सलोखा पुर्वीपासून आजपर्यंत कायम असल्याचं सांगितलं. आम्ही सर्वजण मिळून-मिसळून राहतो, आमचा एकमेकांना त्रास होत नाही असं मुर्तझा म्हणाले. या मशिदीच्या अगदी शेजारीच राहणाऱ्या चंद्रशेखर मातोंडकर यांनीही अशीच काहीशी प्रतिक्रीया दिली.

ADVERTISEMENT

आम्ही पिढ्यानपिढ्या या भागात राहतोय. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे इथे भोंग्यांवर अजान होत नाही. मुस्लीम बांधवांसोबत आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यांच्या आम्हाला आणि आमचा त्यांना कसलाच त्रास होत नसल्याचं मातोंडकर म्हणाले.

ADVERTISEMENT

मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी झाला नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा आदेश राज ठाकरेंनी दिला. ज्यानंतर राज्यात काही भागांमध्ये तणावाचे प्रसंगही पहायला मिळाले. परंतू रत्नागिरीतल्या या मशिदीने लोकहितासाठी घालून दिलेला आदर्श हा नक्कीच वाखणण्याजोगा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT