भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींना वेग?

किरण तारे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

20 जून रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये भाजपसोबत जाणं कसं हिताचं आहे याचा उल्लेख आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेना संपवू पाहात आहेत असंही म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणं पक्षाच्या दृष्टीने योग्य ठरेल असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

आमदार प्रताप सरनाईक हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. ते सध्या ED म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाच्या रडारवर आहेत. नॅशनल स्पोर्ट एक्स्चेंज लिमिटेड अर्थात NSEL चा 5600 कोटींच्या घोटाळ्यात सरनाईक यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यामुळे सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की प्रताप सरनाईक यांनी लिहिलेलं पत्र म्हणजे कातडी बचाव धोरणाचा भाग आहे. मात्र त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे आता एकेकाळचा सहकारी आणि मित्र पक्ष, तसंच सध्या कट्टर विरोधात असलेला भाजपसोबत शिवसेना जाऊ शकते या चर्चांना उधाण आलं आहे.

1989 पासूनच शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकाच विचारसरणीचे पक्ष म्हणून ओळखले जातात. शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार दोनदा महाराष्ट्रात आलं आहे. पहिल्यांदा आलं तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. तसंच उर्वरित सहा ते आठ महिन्यांचा काळ नारायण राणे युतीच्या सत्तेत असताना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. २०१४ मध्ये पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 2019 मध्ये भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीलाच जनमताचा कौल मिळाला होता. या निवडणुकीत भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागी विजय मिळाला. युतीचं सरकार येणार हे निश्चित होतं मात्र मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याच्या फॉर्म्युल्यावरून ही युती फक्त तुटलीच नाही तर दुभंगली. ज्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कामकाज सांभाळत आहेत.

हे वाचलं का?

शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झालेला असताना आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. याची कारणं जाणून घेऊ.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सरकारमधले त्यांचे सहकारी अजित पवार आणि अशोक चव्हाणही होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्यक्तीगत भेटही झाली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातले संबंध सुधारतील आणि दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या. एवढंच नाही तर कोरोना काळात पंतप्रधान मोदींनी जे सहाय्य महाराष्ट्राला केलं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले.

ADVERTISEMENT

फॉर्म्युला

ADVERTISEMENT

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये जर पुन्हा युती झाली तरीही भाजप मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांचा काळ पूर्ण होईपर्यंत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देईल. तोवर भाजपचे दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये असतील. तर अडीच वर्षांनी म्हणजेच 2022 च्या मध्यापर्यंत भाजपला मुख्यमंत्रीपद सोपवलं जाईल. तसंच त्यावेळी काही शिवसेना खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल असा फॉर्म्युला ठरतो आहे. जर युती झाली तर असा फॉर्म्युला प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

जर शिवसेनेने आता युती करण्यासाठी होकार दिला तर हा फॉर्म्युला भाजपकडून दिला जाईल असं बोललं जातं आहे. भाजपच्या सूत्रांचं असंही म्हणणं आहे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला सोबत घेणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना महत्त्वाचं वाटतं आहे. महाराष्ट्र हे देशातलं दुसऱ्या क्रमांकांच मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपला हे वाटतं आहे की लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी कायम राहिली तर त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीला भाजपला मिळणाऱ्या जागांवर होऊ शकतो.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या नेत्यांच्या मागे ED, CBI, NCB यांचा ससेमिरा लागला आहे. प्रताप सरनाईकही ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. अशात उद्धव ठाकरेंवर या सगळ्यातून आपल्या लोकांना कसं सोडवायचं याचा ताण आहेच. जर भाजपसोबत हातमिळवणी झाली तर या काळजीतून त्यांची काहीशी सुटका होऊ शकते असंही बोललं जातं आहे. तसंच केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मोठं आर्थिक पॅकेजही जाहीर करू शकतं असंही बोललं जातं आहे.

एकंदरीत जर विचार केला तर प्रताप सरनाईक यांचं पत्र आणि ८ जूनला उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांन उधाण आलं आहे. प्रत्यक्षात असं काही घडेल का? हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT