‘शाळेचा वैताग येतो’ सांगितल्यावर शाळाच बंद करणार का? शिक्षणतज्ञांचा केसरकरांना सवाल
पुणे : मुलांवरील अभ्यासाचं ओझं कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. केसरकर यांच्या या विधानावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिक्षणतज्ञांनी यावर ‘शाळेचा वैताग येतो’ सांगितल्यावर शाळा बंद करणार का? असा सवाल मंत्री केसरकरांना विचारला आहे. […]
ADVERTISEMENT
पुणे : मुलांवरील अभ्यासाचं ओझं कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. केसरकर यांच्या या विधानावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिक्षणतज्ञांनी यावर ‘शाळेचा वैताग येतो’ सांगितल्यावर शाळा बंद करणार का? असा सवाल मंत्री केसरकरांना विचारला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले शिक्षणतज्ञ?
शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी याबाबत फेसबुक पोस्टवरुन सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गृहपाठ बंद‘ ही पालकांसाठी आनंदाची बातमी खचितच नाही. उलट घरचा अभ्यास देण्यासाठी पालकांचाच आग्रह असतो! काही मुलंदेखील ‘घरचा अभ्यास द्या‘ असे शिक्षकांना म्हणतात आणि आवडीने अभ्यास पूर्ण करून आणतात.
गृहपाठाचा ताण येतो म्हणून दुसरे टोक गाठून एकदम गृहपाठच बंद करणे अजिबात उचित होणार नाही. गृहपाठाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. प्रश्नोत्तरे या साच्यातून गृहपाठ बाहेर काढून त्यात रंजकता, नावीन्य आणणे आवश्यक आहे. मुलांना लिहिताना मजा वाटेल, विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देता येईल असे गृहपाठ देता येणे शक्य आहे.
हे वाचलं का?
कोविड काळात मुलांच्या लिहिण्या-वाचण्याची गती मंदावलेली आहे हेही लक्षात घ्यायला हवे. समजा, ‘आम्हांला शाळेचा वैताग येतो‘ असे मुलांनी संघटित होऊन सांगितले तर शाळाच बंद करणार का? सरकार, मंत्री किंवा अधिकारी बदलले की धोरण बदलते. धोरणातील ही धरसोडवृत्ती शिक्षणाला बाधक ठरते आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली पाहिजे. खूप समजून उमजून शिक्षण क्षेत्रातले निर्णय घेतले पाहिजेत. कारण प्रश्न लाखो मुलांच्या आयुष्याचा आणि भविष्याचा आहे! सरकार ऐकतंय ना? असे काही प्रश्न उपस्थित करुन चासकर यांनी केसरकर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले होते दिपक केसरकर?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळात केसरकर यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मुलांवरील अभ्यासाचं ओझं कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या विचार सुरू आहे.
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. याबाबत शिक्षक संघटना, संस्थाचालकांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल. मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही, असे म्हणून त्यांनी यावर विचार असल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT