मुलगा पार्थ पवारांचं जमीन प्रकरण अन् अजितदादांचं मोठं विधान, 'ती' प्रतिक्रिया जशीच्या तशी...
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप सुरू असताना आता याबाबत अजित पवारांनी मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल 1800 कोटींची जमीन ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. ज्याची स्टॅम्प ड्युटी अवघे 500 एवढीच भरण्यात आल्याचा दावा आता करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. सकाळापासूनच याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी यासाठी माध्यम प्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. मात्र त्यावर अजितदादांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता अवघ्या काही वेळापूर्वी माध्यमांसमोर येऊन अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'मला त्या प्रकरणाबाबत नेमकी माहिती नाही. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वये देखील संबंध नाही. मी सगळी माहिती घेतो.. आणि उद्या तुमच्यासमोर पुन्हा येतो. पण मी आता बोललो नसतो तर म्हटलं असतं की, कुठेतरी पाणी मुरतं आहे.' असं म्हणत अजित पवारांनी या प्रकरणी कोणतीही नेमकी माहिती दिलेली नाही.
अजित पवारांची प्रतिक्रिया जशीच्या तशी..
'सकाळपासून तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता. मला त्याबद्दल एवढंच सांगायचंय की, जे काही आता मीडियामध्ये सुरू आहे.. त्याबद्दलची पूर्ण माहिती मला नाही. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वये देखील संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातील जनता ओळखते. त्या संदर्भात मी उलट यानिमित्ताने संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे. कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. की, अशा-अशा पद्धतीचं काही तरी चाललं आहे. हे कानावर आलं.. त्यावेळेस मी सांगितलं की, असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही. असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या.'
हे ही वाचा>> 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खेरदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये, दानवेंचे अजितदादांच्या मुलावर आरोप
'परंतु त्यानंतर पुन्हा काय झालं ते मला माहिती नाही. पण मीडियामध्ये जमिनीबाबत काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्याची इत्ंयभूत माहिती, त्याचे कागदपत्रं.. कोणी परवानगी दिली, कोणी नाही दिली.. हे सगळं पाहीन.. मी आपल्याला सांगतो.. मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भात कुठेतरी त्यांना फायदा होण्याकरिता एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही.'










