शिवसेनेत ‘व्हीप वॉर’ राहुल नार्वेकर शिवसेना-भाजपचे अधिकृत उमेदवार, शिंदे गटाचा व्हिप
विधानसभेत आज उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा पहिला सामना रंगतोय. कारण विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आज रंगते आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राजन साळवी यांना शिवसेनेचे उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून राजन साळवी ओळखले जातात. शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

विधानसभेत आज उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा पहिला सामना रंगतोय. कारण विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आज रंगते आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राजन साळवी यांना शिवसेनेचे उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून राजन साळवी ओळखले जातात.
शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांसाठी व्हीप काढला आहे. या व्हीपमध्ये राहुल नार्वेकर यांना मतदान करावं असं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात जे बंड झालं त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. ३९ पेक्षा जास्त आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.
एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या व्हीपमध्ये काय म्हटलं आहे?
रविवार दिनांक ३ जुलै २०२२ ला विधीमंडळ विधानसभेचं मुंबईत विशेष अधिवेशन भरवण्यात येतं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसी म्हणजे ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सरकारच्या वतीने अॅड. राहुल नार्वेकर विधानसभा सदस्य हे शिवसेना-भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.
यासाठी शनिवार २ जुलै २०२२ ला संध्याकाळी ७ वाजता ताज प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेड, मुंबई या ठिकाणी सर्व सन्मानीय सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सत्तारूढ पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्णय करायचा आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या सर्व सन्मानीय सदस्यांनी उपस्थित रहावं असा पक्षादेश आहे.
शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी हा व्हीप काढला आहे. शिंदे गटातर्फे निवडण्यात आलेले प्रतोद भारत गोगावले यांचीही सही आहे. शिवसेनेविरोधात बंड केलेल्या एकनाथ शिंदे आणि गटाने विधीमंडळाचे प्रतोद म्हणून भारत गोगावलेंची निवड केली आहे. तर गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. असाच व्हीप शिवसेनेने राजन साळवी यांच्यासाठी काढला आहे. शिवसेनेत दोन व्हीप निघाले आहे. सोमवारी नवनिर्वाचित सरकारला बहुमत सादर करायचं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं आहे?
शिवसेनेतून दोन व्हीप जारी करण्यात आले आहेत शिंदे गटाचे भारत गोगावले यांनी व्हीप जारी केला आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत तर राजन साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आता काय होईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हीपला फारसं महत्त्व या ठिकाणी नाही. मी सर्व सदस्यांना विनंती करेन की योग्य पद्धतीने मतदान करा.