‘उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही,’ असं म्हणणारे माजी खासदार रवींद्र गायकवाड अखेर शिंदे गटात सामील
शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी शिवसेना सोडणार नाही, असं ठणकावून सांगणारे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना आपला योग्य सन्मान केला जाईल, असं सांगितलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांना […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी शिवसेना सोडणार नाही, असं ठणकावून सांगणारे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना आपला योग्य सन्मान केला जाईल, असं सांगितलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांना शिंदे गटात गेल्याने त्याच फलित नेमकं काय मिळतं, हे पहावं लागेल.
आमदार ज्ञानराज चौगुले गायकवाडांना मानतात आपले गुरु
रवींद्र गायकवाड हे एकेकाळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी उस्मानाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून देखील काम पाहिलं आहे. उमरगा तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. उमरगा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले ज्ञानराज चौगुले हे रवींद्र गायकवाड यांना आपले गुरु मानतात. चौगुले शिंदे गटात गेल्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं.
उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं म्हणाले होते गायकवाड
चौगुले यांनी गुवाहाटीतून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये आपण गुरु रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुवाहाटीला आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे रवींद्र गायकवाड हे देखील शिंदे गटात जातात का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर गाईकवाड यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं याचर्चेवर पडदा पडला होता. नंतर अखेर रवींद्र गाईकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंचा हात धरला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे गटाला मिळणार बळ
दरम्यान रवींद्र गाईकवाड यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे गटाला आणखी बळ मिळणार आहे. जिल्ह्यातील दोन आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे अगोदरच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे यापुढे आता सावंत, चौगुले, गायकवाड विरुद्ध खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि कैलास पाटील असा चित्र आगामी काळात दिसू शकतो. रवींद्र गायकवाड यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्र दिले जाऊ शकतात. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला जागा सुटल्यास ते लोकसभेचे उमेदवार देखील राहू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.