स्क्रॅप मर्चंट ते कॅबिनेट मंत्री ‘असा’ आहे शरद पवारांच्या लाडक्या नवाब मलिकांचा प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विरोधकांना आपल्या ट्विटने आणि तिखट वाक्यांनी घायाळ करणारे असा लौकिक असलेले नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली आहे. आज ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर आठ तास चौकशी झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. स्क्रॅप मर्चंट म्हणून त्यांनी त्याची कारकीर्द सुरू केली होती. ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहचले. राष्ट्रवादीचे आक्रमक आणि तिखट भाषा वापरणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सगळ्यात चांगला प्रवक्ता अशी त्यांची ओळख शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत करून दिली होती. त्याच नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली आहे.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात असलेल्या रूसवा या गावात झाला. 20 जून 1959 ला त्यांचा जन्म झाला. मलिक यांचे कुटुंब 1970 मध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईला स्थलांतरित झाले. आणि पुढे मुंबईतच स्थिरावलं. मागच्या 50 ते 60 वर्षांपासून मलिक कुटुंबाचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे. नवाब मलिक राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी हा व्यवसाय बघितला. पंधरा ते वीस वर्षापर्यंत त्यांनी मुंबईत स्क्रॅप मर्चंटचा व्यवसाय बघितला. मलिकांचे पहिले दुकान डोंगरी येथे होतं त्यानंतर कुर्ला या भागात स्क्रॅप व्यवसायाला सुरुवात केली. मलिक यांच्यासह त्यांचे सहा भाऊ आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांच्या शिक्षणाचीही रंजक गोष्ट आहे. प्राथमिक शाळेत असताना त्यांना इंग्रजी माध्यमामध्ये घालण्यात आलं होतं. पण नातेवाईकांच्या विरोधानंतर त्यांना उर्दू शाळेत घालण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परीसरातल्या अंजुमन इस्लाममधून त्यांची बारावी पूर्ण झाली. पण बीएच्या अखेरच्या वर्षी ते परीक्षा देऊ शकले नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या फीवाढीविरोधात पुकारलेल्या आंदोलनात नवाब मलिक सहभागी झाले. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झाले आणि तिथेच विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणाशी जोडले गेले. 1980 मध्ये संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी संजय विचार मंच नावाने वेगळा गट स्थापन केला. याच गटातून नवाब मलिक यांनी लोकसभा लढवली पण ते पराभूत झाले.

लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं… नवाब मलिक यांचा टोला

ADVERTISEMENT

एकविसाव्या वर्षी म्हणजेच 1980 मध्ये नवाब यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना या दोन मुली आहेत. नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राच्या धर्तीवर सांज समाचार नावाचं वृत्तपत्र सुरु केलं होतं पण आर्थिक अडचणींमुळे ते बंद पडलं पण त्यानंतर नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. बाबरी प्रकरणानंतर मुस्लिम मतदारांमध्ये समाजवादी पक्ष लोकप्रिय होऊ लागला होता आणि त्याचा फायदा नवाब मलिक यांना मिळाला.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांच्यावर राजीनामा देण्याचीही वेळ आली होतं. माहिमच्या चाळ पुनर्विकासामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणामध्ये खुद्द अण्णा हजारे यांनी एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण 2008 साली त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात आलं.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक झाली आणि तेव्हापासून नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवायांविरोधात सवाल विचारणा करण्यास सुरुवात केली. जेव्हा न्यायालयानं समीर खान यांना जामीन मंजूर केला. तेव्हापासून तर नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाया आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली..

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर त्याचा सर्वाधिक आक्रमक विरोध नवाब मलिक यांच्याकडूनच झाला. जवळपास 20 ते 25 दिवस नवाब मलिक यांनी रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतली आणि सत्ताधारी भाजपाची घेराबंदी केली. याच काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित व्यक्तींवरही आरोप केले.

गेल्या काही दिवसात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. यामध्ये दाऊदचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. दाऊद आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ता खरेदी करणारे, व्यवहार करणारे राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आले होते. याच प्रकरणात आता नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळते.

पत्रकार ते राजकारणी हा नवाब मलिक यांचा आत्तापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला एक प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून नवाब मलिक यांच्याकडे बघितलं जातं. पण आता नवाब मलिक केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या पुढील नवाब मलिक यांचा प्रवास नेमका कसा राहतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT