Tokyo Olympics मध्ये सुवर्णाध्याय लिहिणाऱ्या Neeraj Chopra चं महाराष्ट्र कनेक्शन माहिती आहे का?
भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहासाची नोंद करत सुवर्णअध्याय लिहीला. तब्बल १३ वर्षांनी नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. अंतिम फेरीत नीरज चोप्राने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं. या कामगिरीनंतर नीरजवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. परंतू टोकिया गाजवणाऱ्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार […]
ADVERTISEMENT
भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहासाची नोंद करत सुवर्णअध्याय लिहीला. तब्बल १३ वर्षांनी नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. अंतिम फेरीत नीरज चोप्राने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं. या कामगिरीनंतर नीरजवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. परंतू टोकिया गाजवणाऱ्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
नीरज चोप्रा हा हरियाणातल्या रोड मराठा समाजाचा खेळाडू आहे. हरियाणातील पानिपत हे नीरज चोप्राचं गाव आहे.
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर मुंबई तक ने हरियाणातले रोड मराठा समाजाचे नेते विरेंद्रसिंग यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना विरेंद्र यांनी नीरज चोप्राच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. “नीरज चोप्राने आज टोकियोत सुवर्णपदक मिळवलं. संपूर्ण रोड मराठा समाज नीरजच्या कामगिरीवर खुश आहे. इथे आता उत्साहाचं वातावरण आहे. हरियाणा आणि संपूर्ण देशाला नीरजचा अभिमान आहे. हरियाणातला रोड मराठा समाज अजूनही आपल्या मुळांशी जोडला गेला आहे. रोड मराठा समाजातली मुलं आपापल्या क्षेत्रात नाव गाजवत आहेत, येणाऱ्या काळातही ही मुलं अशीच कामगिरीत करतील अशी आम्हाला आशा आहे. सरकारने या मुलांना प्रोत्साहन द्यावं, जेणेकरुन ते देशाचं नाव उज्वल करतील.”
हे वाचलं का?
नीरजच्या या कामगिरीनंतर स्थानिक रोड मराठा समाजाच्या लोकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राशी नातं असलेला कोण आहे हा रोड मराठा समाज?
ADVERTISEMENT
पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ आणि अहमदशहा अब्दाली यांचं सैन्य समोरासमोर आलं. या युद्धात मराठा सैन्याचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या काही सैनिकांनी आणि माणसांनी तिकडून पळ काढला. ते आजुबाजूच्या परिसरात लपून राहिले. मराठा म्हणून आपण ओळखले जाऊ अशी भीती त्यावेळी त्यांना होती. तिकडून बाहेर पडल्यानंतर त्यांनी या परिसरातील एक राजा रोडच्या नावानं स्वतःची ओळख करुन देण्यास सुरुवात केली अशी माहिती इतिहासतज्ज्ञ देतात. १४ जानेवारी १७६१ ला मराठ्यांचं सैन्य हरलं. यानंतर जे सैनिक वाचले त्यांनी महाराष्ट्रात न परतता तिकडेच राहणं पसंत केलं. तोच समाज आज रोड मराठा समाज म्हणून ओळखला जातो.
पानिपतचं युद्ध संपल्यानंतर जवळपास २५० मराठा कुटुंब कुरुक्षेत्र आणि करनारच्या जंगलात राहिली. त्यावेळी त्यांना कोणी ओळख विचारली तर ते राजा रोडची ओळख सांगायचे. कालांतराने हीच त्यांची कायमची ओळख बनली. २००० च्या काळात विरेंद्रसिंह यांनी रोड मराठा समाजावर संधोशन करुन त्यांचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. या समाजाचं मूळ हे महाराष्ट्रातच आहे.
Tokyo Olympics 2020: माझं गोल्ड मेडल मिल्खा सिंह यांना समर्पित, मला त्यांना माझं पदक दाखवायचं होतं: Neeraj Chopra
हरियाणातील पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक अशा जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समाजाची संख्या चांगली आहे. हरियाणात सध्याच्या घडीला रोड मराठा समाजाची संख्या सहा ते आठ लाखांच्या घरात आहे. रोड मराठा समाजाची आताची भाषा हिंदी असली तरीही त्यांच्या बोलण्यात अनेक मराठी शब्द प्रामुख्याने यातात. अशा रोड मराठा समाजाच्या नीरज चोप्राने टोकियोमध्ये केलेली कामगिरी हे देशाप्रमाणे महाराष्ट्रासाठीही कौतुकाची बाब आहे.
जोगिंदर मराठा, प्रवक्ते अखिल भारतीय मराठा मंच यांची प्रतिक्रिया
मी भारतात वास्तव्य करणाऱ्या समस्त मराठा समाजाच्या बांधवांचे आणि भगिनींचे सगळ्यांचे नीरज चोप्रा याने जे गोल्ड मेडल जिंकलं आहे त्याबद्दल आभार मानतो. सगळ्यांना त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा देतो. इतिहास या गोष्टीचा साक्ष आहे जो समाज आपल्या इतिहासाशी जोडलेला असतो त्याने कायमच चांगलं यश मिळवलं आहे. पानिपतच्या रोड मराठा समाजाने 250 वर्षांचा अज्ञातवास सहन केला. अज्ञातवासात आयुष्य काढलं. मात्र ज्या दिवसापासून अखिल भारतीय मराठा जागृती मंचाचे संस्थापक मराठा वीरेंद्रजी आणि ज्येष्ठ इतिहासकार वसंत केशव मोरे यांनी जो इतिहास समोर आणला तेव्हा रोड समाजाला ही गोष्ट गौरवास्पद वाटली. आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आणि पानिपतच्या युद्धात आमचे पूर्वज शहीद झाले होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज नीरज चोपडे याने जे यश मिळवलं आहे त्याचा आम्हाला गर्व वाटतो. मी अखिल भारतीय मराठा मंचचा प्रवक्ता या नात्याने तुम्हाला सगळ्यांना या विजयाच्या शुभेच्छा देतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT